Friday, January 16, 2026

गुजराती मतदार पोहोचले गावाला

गुजराती मतदार पोहोचले गावाला

मुंबई : मकरसंक्रांत अर्थात "उत्तरायण" हा गुजरात आणि राजस्थानमधील प्रमुख सण आहे. या काळात जवळपास जागोजागी भव्य पतंग महोत्सवाचे आयोजन केले जाते. त्यानिमित्त मुंबईस्थित गुजराती आणि राजस्थानी बांधव आपापल्या गावी जात असतात. यंदा मुंबई पालिकेच्या मतदानाच्या आदल्या दिवशी मकरसंक्रात आल्याने गुजराती आणि मारवाडी मतदार नेमके काय करतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. मात्र, अधिकांश मतदारांनी संक्रांतीनिमित्त गावी जाणे पसंत केले. गुजरातीबहुल पट्ट्यात दिवसभर मतदारांचा संमिश्र प्रतिसाद दिसून आला. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जे मतदार सकाळच्या सत्रात मतदान करायचे, ती संख्या यावेळेस कमी झालेली दिसली.

मतदारांची पायपीट

जोगेश्‍वरीच्या प्रभाग क्रमांक ७७ मधील मतदारांना यंदा मतदानासाठी अर्धा ते एक किलोमीटर अंतराची पायपीट करावी लागली. पालिकेचे मैदान, म्हाडा वसाहत, इमारत क्रमांक १० शेजारील पार्क व्ह्यू बिल्डिंगलगत, पंडाल डी, शिवनेरी वसाहत रोड येथील मतदान केंद्रावर जाण्यासाठी नागरिकांना त्रास झाला. गेल्या अनेक वर्षांपासून जवळच असलेल्या समर्थ विद्यालयात किंवा फार तर चालण्याच्या अंतरावर असलेल्या मल्होत्रा टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये मतदान केंद्र असायचे. यंदा मतदान केंद्र दूर हलविण्यात आल्याने अनेक मतदारांना सकाळच्या वेळेत मतदान केंद्र शोधण्यातच वेळ घालवावा लागल्याचे चित्र परिसरात पाहायला मिळाले.

- धारावीतही असाच प्रकार समोर आला. मतदार यादीत नाव नाही, या केंद्रावरून त्या केंद्रावर फेऱ्या मारून कंटाळलेले मतदार मतदान न करताच अखेर निवडणूक केंद्रातून घरी गेले. धारावीतील शाहु नगरात हा प्रकार घडला. निवडणूक आयोगाने वाटलेल्या पावत्यांमध्ये नागरिकांचे नाव एका केंद्रात तर, मतदानासाठी दुसऱ्या केंद्रात जावे लागले. मतदार यादीत नाव शोधण्यासाठी या केंद्रातून त्या केंद्रातून पायपीट करावी लागली. जेष्ठ नागरिकांसह महिलांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे या कारभाराला कंटाळून मतदारांनी थेट घरची वाट धरली.

मंत्री गणेश नाईकांना करावी लागली धावपळ

नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानासाठी घराबाहेर पडलेल्या वनमंत्री गणेश यांनाही मतदानकेंद्र शोधताना मोठी धावपळ करावी लागली. सुरुवातीला दोन मतदान केंद्रांवर चौकशी करूनही गणेश नाईक आणि त्यांच्या परिवाराची नावे मतदार यादीत आढळली नाहीत. त्यामुळे याबाबत संभ्रम निर्माण झाला. अखेर कोपरखैरणे येथील सेंट मेरी हायस्कूलमधील मतदान केंद्रावर गणेश नाईक, संजीव नाईक आणि कल्पना नाईक यांची नावे यादीत असल्याचे स्पष्ट झाले आणि त्यानंतर त्यांनी मतदान केले. मात्र माजी महापौर सागर नाईक आणि त्यांच्या पत्नीचे नाव वेगळ्या ठिकाणी असल्याचे आढळले. त्यामुळे नेहमी एकाच मतदान केंद्रावर मतदान करणाऱ्या संपूर्ण नाईक परिवाराला यावेळी वेगवेगळ्या ठिकाणी मतदान करावे लागले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >