Thursday, January 15, 2026

Mumbai Local Train Power Block : प्रवाशांनो घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक तपासा! पनवेल, कर्जत, कल्याण मार्गावर ब्लॉकचा मोठा फटका; परिणाम कुठे होणार ?

Mumbai Local Train Power Block : प्रवाशांनो घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक तपासा! पनवेल, कर्जत, कल्याण मार्गावर ब्लॉकचा मोठा फटका; परिणाम कुठे होणार ?

मुंबई : डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर (समर्पित माल वाहतूक मार्ग) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाला वेग देण्यासाठी मध्य रेल्वेने १८ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत पनवेल ते कळंबोली दरम्यान विशेष 'ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक' जाहीर केला आहे. या मार्गावर ११० मीटर लांबीचा 'ओपन वेब गर्डर' उभारण्यात येणार असून, रेल्वेच्या तांत्रिक कामामुळे प्रवाशांना काही प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. ११० मीटर लांबीच्या या गर्डरचे एकूण वजन तब्बल १,५०० मेट्रिक टन आहे. इतक्या मोठ्या वजनाचा गर्डर रेल्वे रुळांच्या वरून नेणे हे आव्हानात्मक काम असल्याने, प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेऊन मध्यरात्रीच्या वेळी टप्प्याटप्प्याने ही उभारणी पूर्ण केली जाणार आहे.

मेल-एक्स्प्रेसवर होणारा परिणाम

या विशेष ब्लॉकमुळे पनवेल-कळंबोली मार्गावरील अप आणि डाउन दोन्ही मार्गांवरील वाहतूक प्रभावित होईल. प्रामुख्याने १६ मेल-एक्स्प्रेस गाड्यांवर याचा थेट परिणाम होणार आहे. यातील काही गाड्या रद्द केल्या जाऊ शकतात किंवा त्यांच्या मार्गात बदल केला जाईल, तर काही गाड्या विलंबाने धावतील. प्रवाशांनी प्रवासाला निघण्यापूर्वी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा हेल्पलाइनवर आपल्या गाडीची स्थिती तपासून घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मालवाहतुकीसाठी स्वतंत्र मार्गिका तयार करण्याच्या उद्देशाने डीएफसीसी प्रकल्प राबवला जात आहे. या कामामुळे भविष्यात मालगाड्यांचा वेग वाढून प्रवासी गाड्यांच्या वेळापत्रकातील अडथळे दूर होण्यास मदत होणार आहे. मात्र, या कामासाठी पुढील एक महिना रविवारी आणि रात्रीच्या वेळी ब्लॉकचे सत्र सुरू राहणार आहे.

जानेवारीमध्ये कोणत्या गाड्यांवर परिणाम?

१८-१९ जानेवारी (रविवार/सोमवार मध्यरात्र) : या दिवशी मध्यरात्री १:२० ते ३:२० दरम्यान होणाऱ्या कामामुळे दौंड-ग्वाल्हेर एक्सप्रेस (२२१९३) ही गाडी नियमित मार्गाऐवजी कर्जत-कल्याण-वसई रोड मार्गे वळवण्यात आली आहे. तसेच, मंगळूर-सीएसएमटी एक्सप्रेस (१२१३४) ही पनवेल स्थानकात सुमारे ६ मिनिटे ( पहाटे ३:१४ ते ३:२०) थांबवून ठेवली जाईल.

२५-२६ जानेवारी (रविवार/सोमवार मध्यरात्र) : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच २५ जानेवारीच्या मध्यरात्री १:२० ते पहाटे ५:२० दरम्यान मोठा ब्लॉक घेण्यात येईल. याचा परिणाम खालील गाड्यांवर होईल:

दौंड-ग्वाल्हेर एक्सप्रेस (२२१९३) : पुन्हा एकदा कर्जत-कल्याण-वसई रोड मार्गे वळवण्यात येईल.

मंगळूर-सीएसएमटी एक्सप्रेस (१२१३४) : ही गाडी सोमटाणे स्थानकात पहाटे २:५८ ते ५:२० पर्यंत थांबवली जाईल.

कोकण कन्या एक्सप्रेस (२०११२) : मडगावहून येणारी ही गाडी पनवेलमध्ये पहाटे ४:०२ ते ५:२० पर्यंत रोखून धरली जाईल.

तुतारी एक्सप्रेस (११०४) : सावंतवाडी-दादर ही गाडी आपटा स्थानकात पहाटे ४:२५ ते ५:१५ दरम्यान थांबेल.

मत्स्यगंधा एक्सप्रेस (१२६२०) : मंगळूर-एलटीटी ही गाडी जिते स्थानकात पहाटे ४:४१ ते ५:१० दरम्यान थांबवण्यात येईल.

दिवसाच्या गाड्यांवरही परिणाम 

केवळ रात्रीच्याच नव्हे, तर सकाळी सुटणाऱ्या गाड्यांवरही याचा परिणाम होणार आहे. सीएसएमटी-मडगाव मांडवी एक्सप्रेस (१०१०३) ही गाडी मुंबईहून सुटण्याची वेळ बदलण्यात आली असून, ती सकाळी ७:१० ऐवजी ८:२० वाजता सुटेल. याशिवाय, हुबळी-दादर एक्सप्रेस (१७३१७) ही गाडी १५ ते २० मिनिटे उशिराने धावण्याची शक्यता रेल्वेने वर्तवली आहे.

फेब्रुवारीत 'या' दिवशी गाड्यांच्या वेळेत बदल

३-४ आणि १०-११ फेब्रुवारीचे वेळापत्रक: फेब्रुवारीच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यातील मंगळवार आणि बुधवारच्या मध्यरात्री (१:२० ते ४:२०) हा ब्लॉक घेतला जाईल. या काळात खालीलप्रमाणे गाड्यांच्या वेळेत बदल होतील:

मंगळूर-सीएसएमटी एक्सप्रेस (१२१३४) : दक्षिण भारतातून मुंबईकडे येणारी ही गाडी सोमटाणे स्थानकात पहाटे २:५८ ते ४:१० या वेळेत थांबवून धरली जाईल. यामुळे प्रवाशांना मुंबईत पोहोचण्यासाठी किमान सव्वा तास उशीर होऊ शकतो.

मडगाव-सीएसएमटी कोकण कन्या एक्सप्रेस (२०११२) : कोकणातून येणारी ही लोकप्रिय गाडी पनवेल स्थानकात पहाटे ४:०२ ते ४:२० या वेळेत रोखली जाईल. प्रवाशांना पहाटेच्या वेळी पनवेलमध्ये २० मिनिटे ताटकळावे लागेल.

प्रशासनाचे आवाहन

हे काम डीएफसीसी प्रकल्पाच्या गर्डर उभारणीसाठी अत्यंत आवश्यक असल्याने रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. या दोन दिवसांच्या मध्यरात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी, विशेषतः मुंबईत पहाटेच्या नियोजित कामांसाठी पोहोचणाऱ्या नागरिकांनी या बदलांची नोंद घ्यावी. १० आणि ११ फेब्रुवारीच्या रात्रीदेखील अशाच प्रकारचे निर्बंध लागू राहतील, ज्यामुळे प्रवासाचा वेळ वाढण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment