मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या मुद्द्यावरून मोठे राजकीय युद्ध पेटले आहे. शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मतदानाच्या शाईच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर, भारतीय जनता पक्षाने त्यावर कडाडून टीका केली आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी ठाकरेंच्या आरोपांचा समाचार घेताना अत्यंत बोचरी टीका केली आहे. मतदानाची प्रक्रिया सुरू असताना उद्धव ठाकरे यांनी आरोप केला की, मतदारांच्या बोटाला लावली जाणारी शाई सहजपणे पुसली जात आहे. हा प्रकार लोकशाहीच्या प्रक्रियेत संशयास्पद असून प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. मात्र, ठाकरे यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आणि शाईच्या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले.
मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान 'बोटावरील शाई पुसली जात असल्याच्या' अफवा आणि तक्रारींच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक ...
आशिष शेलारांचे चोख प्रत्युत्तर
उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेवर भाजपचे नेते आशिष शेलार यांनी जोरदार हल्लाबोल केला. "ठाकरे बंधू हे नेहमीच 'रडके' राहिले आहेत. प्रत्येक वेळी निवडणुकीत पराभव समोर दिसू लागला की, असे रडगाणे गाणे आणि नवीन नाटक सुरू करणे ही त्यांची जुनी पद्धत आहे," अशा शब्दांत शेलारांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. शाईचा मुद्दा हा केवळ लोकांची दिशाभूल करण्यासाठी उकरून काढलेला असून त्यात कोणतेही तथ्य नसल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. दुसरीकडे, प्रशासनाने आणि निवडणूक आयोगाने अशा प्रकारचे सर्व आरोप यापूर्वीच फेटाळले असून, बोटावरील शाई पुसल्याच्या वृत्तात कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. शाई पुसली तरी मतदाराची नोंद आधीच झालेली असल्याने दुबार मतदान शक्य नाही, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
शेलार यांनी व्यक्त केला संशय
मतदानाची शाई पुसली जात असल्याच्या दाव्यावर शेलार यांनी संशय व्यक्त केला आहे. ज्याने कुणी शाई पुसण्याचा प्रयत्न केला, त्याचा हेतू गुन्हेगारी स्वरूपाचा असू शकतो. शाई पुसण्यापूर्वी बोटावर तेल लावले होते का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ज्यांना दुबार मतदान करायचे आहे, तेच अशा प्रकारे शाई पुसण्याचे प्रकार करू शकतात. त्यामुळे ज्याने शाई पुसली आहे, त्याच्यावर निवडणूक आयोगाने गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी शेलार यांनी केली आहे. रशियावरून तेल आणले आहे का, असा टोला लगावत त्यांनी ठाकरे आणि त्यांच्या समर्थकांच्या शाईबद्दल शंका उपस्थित केली.
राजकीय मेंदूत केमिकल लोचा!
शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या या आरोपाचा समाचार घेताना भाजपचे नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. ठाकरेंच्या राजकीय बुद्धीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, त्यांच्या मेंदूत 'केमिकल लोचा' झाला असल्याची बोचरी टीका शेलार यांनी केली आहे. आशिष शेलार यांनी यावेळी उद्धव ठाकरेंनी आजवर केलेल्या विविध आरोपांची जणू यादीच वाचून दाखवली. "आधी त्यांनी मतचोरीचा आरोप केला, मग मतदार यादीतील नावांची चोरी झाल्याचे म्हटले. त्यानंतर दुबार मतदान, ईव्हीएम (EVM) मशीनमधील बिघाड आणि अगदी निवडणूक अधिकाऱ्यांच्या निवडीतही चोरी झाल्याचे अजब दावे त्यांनी केले. आता या सर्व गोष्टी संपल्यावर त्यांनी थेट मतदानाच्या शाईवरच संशय व्यक्त करायला सुरुवात केली आहे," असे शेलार म्हणाले. उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेला शेलार यांनी निव्वळ 'राजकीय कथानक' (Scripted Narrative) ठरवले आहे. "हे सर्व पाहता ठाकरेंच्या राजकीय मेंदूत केमिकल लोचा झाला असून ही केवळ बुद्धीतील हेराफेरी आहे," अशी टीका त्यांनी केली.
रडणाऱ्यांच्या मागे मुंबईकर जाणार नाहीत!
निवडणूक आयोगाकडे कोणतीही अधिकृत तक्रार दाखल न करता केवळ पत्रकार परिषदा घेऊन गोंधळ घालणे, हा निव्वळ निवडणूक प्रचाराचा आणि प्रसिद्धीचा भाग असल्याची टीका शेलार यांनी केली आहे. शाई पुसली जात असल्याच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेवर शेलार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. "राज ठाकरेंना हा प्रश्न मतदानाच्या दिवशीच का सुचला? हे त्यांना आधी का सुचले नाही?" असा थेट सवाल शेलार यांनी केला आहे. विरोधकांवर 'रडके' असल्याची बोचरी टीका करताना शेलार म्हणाले की, मुंबईचा नागरिक सुज्ञ आहे आणि तो अशा रडणाऱ्या नेत्यांच्या पाठीशी कधीही उभा राहणार नाही. तक्रार करण्याचा कायदेशीर मार्ग सोडून केवळ कॅमेऱ्यासमोर आरोप करणे हे राजकीय अपरिपक्वतेचे लक्षण आहे, असेही ते म्हणाले. विरोधकांनी रडण्याची सवय सोडावी आणि जनतेने लोकशाही बळकट करण्यासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडून मतदान करावे, असे आवाहन शेलार यांनी केले. कोणत्याही अफवांना किंवा राजकीय 'इव्हेंट'ला बळी न पडता नागरिकांनी आपला हक्क बजवावा, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.






