कांदिवली: बोरिवली पूर्व येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या अदलाबदल कार्यक्रमांतर्गत गुजरातच्या जुनागढ येथील सक्करबाग प्राणीसंग्रहालयातून आणलेल्या सिंह मानस आणि सिंहीणी भारती या जोडीने ११ जानेवारी रोजी तीन निरोगी शावकांना जन्म दिला, अशी माहिती उद्यानाच्या संचालिका अनिता पाटील यांनी दिली. सध्या उद्यानात १३ वाघ व ५ सिंह पिंजऱ्यात असून परिसरात ५० हून अधिक बिबटे मुक्त संचार करत आहेत. मागील वर्षी १६ जानेवारी २०२५ रोजी सिंहिणी मानसी आणि सिंह मानस यांना एका मादीला जन्म दिला होता. ती सध्या निरोगी आहे. या नव्या जन्मामुळे उद्यानातील संवर्धन प्रजनन उपक्रमांना बळ मिळाले असल्याचे, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे वनसरंक्षक आणि संचालक अनिता पाटील यांनी सांगितले. तसेच संजय गांधी उद्यानात तीन शावकांचा जन्म ही अभिमानाची बाब असून यामुळे संवर्धन प्रजनन व वैज्ञानिक प्राणी व्यवस्थापनाबाबतची आमची बांधिलकी अधोरेखित होते. प्रत्येक यशस्वी जन्मामागे पशुवैद्यकीय अधिकारी, प्राणीपालक व वन कर्मचाऱ्यांचे समर्पित टीमवर्क असल्याचे पाटील यांनी सांगितले.






