पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता सुबोध भावे यांनी मतदानानंतर केलेल्या एका वक्तव्याने शहरात चर्चेला उधाण आले आहे. कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावल्यानंतर त्यांनी पुण्याच्या सध्याच्या विकास प्रक्रियेबाबत आपली भूमिका मांडली.
पुण्याचा विस्तार वेगाने होत असला, तरी हा बदल नागरिकांसाठी अत्यंत गरजेचा आहे का?, असा प्रश्न भावे यांनी उपस्थित केला. विकास म्हणजे केवळ उंच इमारती उभ्या राहणे नव्हे, तर त्यासोबत मोकळ्या जागा, मैदाने आणि सार्वजनिक सुविधा असणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. काही भागांमध्ये कमी उंचीच्या इमारतींच्या जागी मोठमोठ्या संकुलांचे बांधकाम होत असल्याने शहरावर ताण वाढत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
यावेळी बोलताना त्यांनी नागरिकांच्या भूमिकेवरही भर दिला. केवळ मतदान करून थांबणे पुरेसे नसून, निवडून आलेल्या प्रतिनिधींनी दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी होते की नाही, याकडे लक्ष ठेवणे ही नागरिकांचीही जबाबदारी असल्याचे ते म्हणाले. नागरिक एकत्र येऊन आपली मतं ठामपणे मांडतील, तरच विकासाची दिशा बदलू शकते, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
शहर नियोजनाबाबत बोलताना भावे यांनी मोकळ्या जागांचे महत्त्व अधोरेखित केले. मुलांसाठी खेळाची ठिकाणे आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळ्याच्या जागा उपलब्ध असणे गरजेचे असल्याचे सांगत, विकासाचे निकष पुन्हा एकदा तपासण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, त्यांच्या या मतप्रदर्शनामुळे पुणेकरांमध्ये चर्चा सुरू झाली असून, अनेकांनी त्यांच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर समोर अलेलले हे वक्तव्य पुणेकरांना भविष्यासंदर्भात विचार करायला लावणारे आहे.






