पगार रखडल्याने 'सत्याग्रह' सहाव्या दिवशीही सुरूच
वाडा : कुडूस येथील प्रसिद्ध मिर्क इलेक्ट्रॉनिक्स (ओनिडा) कंपनीतील कामगारांनी आपल्या न्याय्य हक्कासाठी पुकारलेले सत्याग्रह आंदोलन आज सहाव्या दिवशीही अधिक तीव्र झाले आहे. मागील दोन महिन्यांपासून पगार रखडल्याने आक्रमक झालेल्या कामगारांनी, जोपर्यंत खात्यात पैसे जमा होत नाहीत, तोपर्यंत कंपनीचे गेट सोडणार नाही, असा निर्धार व्यक्त केला आहे. टेलिव्हिजन आणि एअर कंडिशनर्स बनवणाऱ्या या नामांकित कंपनीत अनेक कामगार गेल्या २८ वर्षांपासून इमानेइतबारे सेवा देत आहेत. मात्र, व्यवस्थापनाने मागील दोन महिन्यांपासून या कायमस्वरूपी कामगारांचे पगार रोखून धरले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, एकीकडे प्रत्यक्ष घाम गाळणाऱ्या कामगारांना पगार नाही, तर दुसरीकडे कार्यालयीन कर्मचारी कामावर न येताही त्यांना पगार दिला जात असल्याचा गंभीर आरोप कामगारांनी केला आहे. "हा दुजाभाव का?" असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे. श्रमजीवी कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. ८ जानेवारीपासून सुरू झालेल्या या सत्याग्रहाला संघटनेचे प्रदेश सरचिटणीस विजय जाधव आणि तालुका अध्यक्ष राजू जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन जाहीर पाठिंबा दिला आहे. यामुळे कामगारांचे मनोधैर्य उंचावले असून आंदोलनाची धार अधिक वाढली आहे.
कामगारांच्या मागण्या :
- मागील दोन महिन्यांचा थकीत पगार तत्काळ खात्यात जमा करावा.
- कामगार आणि कार्यालयीन कर्मचारी यांच्यातील पगाराबाबतचा दुजाभाव थांबवावा.
- २८ वर्षांपासून सेवा देणाऱ्या ज्येष्ठ कामगारांना सन्मानाची वागणूक द्यावी.






