Wednesday, January 14, 2026

सिंचन घोटाळ्याच्या फाईलबाबत २५ वर्षे चुप्पी का?

सिंचन घोटाळ्याच्या फाईलबाबत २५ वर्षे चुप्पी का?

 महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा अजित पवारांना सवाल

मुंबई : पुरंदरमधील सिंचन प्रकल्पातील कथित भ्रष्टाचाराच्या फाईलबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार १९९९ पासून २५ वर्षे गप्प का राहिले, असा थेट सवाल महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केला आहे. तसेच अजित पवारांकडून अशी अपेक्षा नव्हती," अशी खंतही व्यक्त केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तत्कालीन शिवसेना-भाजप सरकारवर सिंचन प्रकल्पात भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले, "१९९९ ला जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार सत्तारूढ झाले तेव्हा माझ्याकडे जलसंपदा खाते आले. तेव्हा पुणे जिल्ह्यातील पुरंदर उपसा सिंचन योजनेची फाईल माझ्याकडे आली. मी पाहिली असता त्यामध्ये या योजनेची रक्कम ३१० कोटी रुपये असल्याचे आढळून आले. मात्र मी अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी या प्रकल्पाची किंमत आधीच्या सरकारने वाढवल्याचे सांगितले. या प्रकल्पाची किंमत २०० कोटी रुपयेच असल्याचे त्या अधिकाऱ्याने कबुल केले. पुढे त्या अधिकाऱ्याने असेही सांगितलं की, १०० कोटी रुपये पार्टी फंडासाठी मागण्यात आले होते. मग आम्ही अधिकाऱ्यांनी देखील त्यामध्ये आमचे १० कोटी वाढवले आणि प्रकल्पाची किंमत ३१० कोटी झाली. ती फाईल अजुनही माझ्याकडे आहे. ती जर काढली असती तर हाहाकार माजला असता," असा दावा अजित पवारांनी केला आहे. त्यावर महसूलमंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केले आहे. "१९९९ ते २०२४ हा मोठा काळ आहे. १९९९ ला जेव्हा अजित पवार यांच्याकडे ही फाईल आली होती, तेव्हा आरोप केले असते तर आम्ही समजले असते. मात्र एवढ्या उशिरा असा आरोप करणे योग्य नाही. जनता यावर विश्वास करणार नाही. शिवाय अजित पवारांकडून अशी अपेक्षा नव्हती," अशी खंतही बावनकुळे यांनी व्यक्त केली आहे. ...... अजित पवार त्रस्त - बावनकुळे "पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या निवडणुकीमुळे अजित पवार त्रस्त आहेत. त्यांच्यात नकारात्मकता आहे. मात्र, त्यांनी मनभेद, मतभेद होईल असे वागले नाही पाहिजे. युतीच्या समन्वय समितीमध्ये जरी मी असलो, तरी अजित पवार हे वरिष्ठ नेते आहेत. त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती. अजित पवारांना दोन्ही राष्ट्रवादी एक करायची आहे की नाही, हा निर्णय त्यांना घ्यायचा आहे. जेव्हा अधिकृत घोषणा होईल तेव्हा आम्ही त्यावर चर्चा करू," असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >