Wednesday, January 14, 2026

Weather Update :महाराष्ट्रातील पुढील काही तास महत्त्वाचे,वारे आणि तुरळक पावसाचा इशारा

Weather Update :महाराष्ट्रातील पुढील काही तास महत्त्वाचे,वारे आणि तुरळक पावसाचा इशारा
Weather Update : मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राभर सध्या हवामानाची चंचलता पाहायला मिळत आहे. मुंबईत थंडीचा जोर काहीसा कमी झाला असला तरी हवेत गारवा वाटत आहे. सकाळी आणि रात्री थंड वातावरण, तर दुपारी अचानक तापमान वाढल्याने उष्णता जाणवायला सुरुवात झाली आहे. राज्यातील अनेक भागांत हा तापमानातील तफावत नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तापमानात लक्षणीय घट नोंदवली जात आहे. काही ठिकाणी गारठ्याची परिस्थिती असून थंडीचा कडाका जाणवत आहे. दरम्यान, हवामान खात्याने पुढील 72 तास महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे असल्याचा इशारा दिला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने दक्षिण भारतातील काही भागांत जोरदार वारे आणि पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याचा परिणाम महाराष्ट्रावरही होण्याची शक्यता आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता नसली, तरी ढगाळ वातावरण, जोरदार वारे आणि काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी कोसळू शकतात, असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. मकर संक्रांतीपर्यंत हवामानात फारसा बदल होणार नसल्याचा अंदाज आहे. थंडीची तीव्र लाट नसली तरी गारवा कायम राहणार आहे. मात्र मकर संक्रांतीनंतर तापमानात हळूहळू वाढ होऊन थंडीचा प्रभाव कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, सांगली जिल्ह्यात रविवारी रात्री अवकाळी पावसाने हजेरी लावली. कडाक्याच्या थंडीने गारठलेल्या सांगलीकरांना अचानक झालेल्या पावसाचा अनुभव घ्यावा लागला. रात्री रिमझिम पावसामुळे वातावरणात गारवा वाढला असून महापालिका निवडणुकीच्या प्रचारावरही त्याचा परिणाम झाला. याआधी मुंबई आणि पुण्यातही काही भागांत पावसाच्या हलक्या सरी पडल्या होत्या. सतत बदलणाऱ्या हवामानामुळे राज्यभरात सर्दी, ताप यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढताना दिसत असून नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >