मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोप; कुणाचाही महापौर झाला तरी आम्ही भोंग्यांना परवानगी देणार नाही
मुंबई : मशीदीवरील भोंगे पुन्हा लावण्याचे वचन देत उद्धव ठाकरेंनी निवडणूक प्रचार केला, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. परंतु, मुंबईत कोणाचाही महापौर झाला, तरी भोंग्यांना कदापी परवानगी दिली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. ‘एनएनआय’ वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी उबाठाच्या बेगडी हिंदुत्वावर कठोर शब्दांत टीका केली.
फडणवीस म्हणाले, मशिदींवरील भोंगे काढले पाहिजेत, ही भूमिका बाळासाहेब ठाकरे यांची होती. त्यांनी यासंदर्भात स्पष्ट मागणी केली होती आणि सर्वोच्च न्यायालयानेही यावर निर्णय दिला आहे. मी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असताना कोणतीही जोरजबरदस्ती न करता, सामंजस्याने सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय समजावून सांगत भोंगे काढले होते. परंतु, निवडणूक जिंकण्यासाठी आता पुन्हा लाऊडस्पीकर लावण्याचे वचन दिले जात असेल, तर उद्धव ठाकरेंनी त्याचे उत्तर दिले पाहिजे. ‘आम्हाला निवडून द्या, आम्ही भोंगे परत लावू’ असा प्रचार करणे, यापेक्षा मोठे लांगुलचालन काय असू शकते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची आणि संविधानाची पायमल्ली केली तर त्याची प्रतिक्रिया उमटल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला.
हिंदुत्वाबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, हिंदुत्व हा आमचा आत्मा आहे. आम्ही मत मागताना हिंदुत्व विकत नाही, तर ते आमच्या विचारांत आणि कृतीतून दिसते. आमचे हिंदुत्व संकुचित नाही, पूजा-पद्धतीपुरते मर्यादित नाही. देशाची प्राचीन संस्कृती आणि जीवनपद्धती मानणारा प्रत्येक माणूस आमच्यासाठी हिंदू आहे. मराठी आणि मुस्लिम (ममु) युती करून सत्तेत येण्याच्या वल्गना केल्या जातात, तसेच जाणीवपूर्वक मराठी आणि हिंदू यांच्यात भेद निर्माण करण्याचा प्रयत्न होतो. मात्र मराठी आणि हिंदू हे वेगळे नाहीत. हिंदुत्वाशी कोणतीही तडजोड होऊ शकत नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
दोन्ही पक्षांसाठी अस्तित्वाची लढाई
ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत बोलताना ते म्हणाले, “माझ्यामुळे ठाकरे बंधू एकत्र आले असतील तर ती माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. कारण बाळासाहेब ठाकरे यांनाही तेच अपेक्षित होते. मात्र हा प्रीतीसंगम नसून भीतीसंगम आहे. दोन्ही पक्षांसाठी अस्तित्वाची लढाई असल्यामुळे ते एकत्र आले आहेत,” असा टोला देखील फडणवीस यांनी लगावला.






