पूर्वसूचना न देताच पादचारी पूल हटवला
तलासरी : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वरवाडा येथे असलेली पादचारी पुलाची समस्या आता विद्यार्थिनींच्या जीवावर बेतण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नॅशनल हायवे प्राधिकरणाने मंगळवारी कोणतीही पूर्वसूचना न देता येथील पादचारी पूल थेट काढून टाकल्याने, वरवाडा आश्रमशाळेतील ६०० विद्यार्थिनींना जीव मुठीत धरून हायवे ओलांडावा लागत आहे. प्राधिकरणाच्या या मनमानी कारभारामुळे पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
महामार्गावर बनवण्यात आलेल्या या पादचारी पुलाची उंची नियमानुसार साडेपाच मीटर आहे. मात्र, या मार्गावरून वारंवार 'ओव्हर डायमेन्शन' (अवाढव्य उंच) असलेली अवजड वाहने जात असतात. या वाहनांना रस्ता मोकळा करून देण्यासाठी महिना-दोन महिन्यातून हा पूल वारंवार काढावा लागतो. सोमवारी सकाळी गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या दोन अवाढव्य वाहनांसाठी हा पूल काढण्यात आला होता.
कोणतीही पूर्वसूचना नसल्याने शाळेतील मुली आणि ग्रामस्थांची मोठी गैरसोय झाली. यावेळी पुलाअभावी विद्यार्थिनींना हायवे ओलांडणे कठीण झाले होते, ज्यामुळे वाहतूक कोंडीही झाली. अखेर तलासरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली आणि मुलींना सुरक्षितपणे रस्ता ओलांडून दिला. एखाद्या वाहनाने धडक दिल्यास होणाऱ्या जीवितहानीला जबाबदार कोण? असा सवाल आता ग्रामस्थ विचारत आहेत.
त्याचप्रमाणे या गंभीर घटनेबाबत डहाणूचे आमदार विनोद निकोले यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. जर हा पादचारी पूल तातडीने पुन्हा बांधून दिला नाही तर प्राधिकरणाच्या बेजबाबदार भूमिकेवर आवज उठवला जाईल. येत्या १९ तारखेला होणाऱ्या मोर्चामध्ये हा मुद्दा ठामपणे उपस्थित केला जाईल. त्याचप्रमाणे चारोटी पासून मोर्चा हालणार नाही असा इशारा आमदार विनोद निकोले यांनी दिला आहे.
महामार्ग प्राधिकरणाचे मौन : या प्रकरणाबाबत अधिकृत माहिती घेण्यासाठी आणि कायमस्वरूपी तोडग्याबाबत विचारणा करण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाचे व्यवस्थापक सुहास चिटणीस यांच्याशी मोबाइलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी फोन उचलला नाही. प्राधिकरणाच्या या बेजबाबदार भूमिकेमुळे स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
आमच्या शासकीय आश्रमशाळेत बाहेरून ये-जा करणाऱ्या ६०० मुली आहेत. येथील पादचारी पूल वारंवार काढला जात असल्याने या मुलींना आपला जीव मुठीत धरून महामार्ग ओलांडावा लागतो. ही अत्यंत चिंतेची बाब आहे." — सुरेश इभाड, मुख्याध्यापक, आश्रमशाळा वरवाडा.
"कोणतीही पूर्वसूचना न देता पादचारी पूल काढण्यात आल्याने सोमवारी मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. कोणताही अपघात किंवा दुर्घटना घडू नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून घटनास्थळी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत." — अजय गोरड, पोलीस निरीक्षक, तलासरी पोलीस स्टेशन.






