Wednesday, January 14, 2026

BMC Election 2026 : ६६ नगरसेवकांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा, मनसेची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली; याचिकाकर्त्यांना सुनावले खडेबोल

BMC Election 2026 : ६६ नगरसेवकांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा, मनसेची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली; याचिकाकर्त्यांना सुनावले खडेबोल

मुंबई : राज्यातील महानगरपालिका निवडणुकीत ६६ नगरसेवकांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला असून, याविरोधात मनसेच्या अविनाश जाधव यांनी दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. उमेदवार बिनविरोध निवडून आला असला, तरी मतदारांसाठी नोटाचा पर्याय असावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती.

मात्र, न्यायालयाने याचिकाकर्त्यांना खडे बोल सुनावत ही याचिका फेटाळून लावली. तुम्ही न्यायालयात सकाळी चुकीचा युक्तिवाद केला, तसेच रिट पिटिशन आणि आधीच्या याचिकेत सार्धम्य असल्याचे सांगितले, मात्र यामध्ये काहीही साम्य आढळून आलेले नाही, त्यामुळे आम्ही याचिकाकर्त्यांना दंड ठोठावत असल्याचे सुरुवातीला न्यायमूर्तींनी सांगितले.

बुधवारी सकाळी ही याचिका इतर प्रलंबित याचिकांसारखीच असल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र, सुनावणीसाठी याचिका पुकारण्यात आल्यानंतर ऑनलाईन उपस्थित असलेले असीम सरोदे यांनी सांगितले की ही याचिका तत्सम नसून निवडणुकीशी संबंधित आहे. यामुळे मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम ए. अंखड यांच्या खंडपीठाने नाराजी व्यक्त केली. चुकीचे विधान केल्याबद्दल आम्ही तुमच्यावर दंड लावणार आहोत आणि याचिका फेटाळणार आहोत, असे हायकोर्टाकडून सांगण्यात आले. एखाद्या पक्षकारासाठी अशी चुकीची माहिती देण्यामागे तुमची घाई किंवा भीती काय होती?, असा सवालही न्यायालयाने याचिकाकर्त्यांना विचारला. शेवटी न्यायालयाने दंड न आकारता ही याचिका फेटाळून लावली.

किती नगरसेवक बिनविरोध?

राज्यातील २९ महानगरपालिकांमध्ये मतदान होण्यापूर्वीच ६६ उमेदवार विजयी झाले आहेत. निवडणुका बिनविरोध करण्यात भाजपाने आघाडी घेतली असून, भाजपचे ४४ उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. त्यापाठोपाठ निवडणुका बिनविरोध करण्यात शिवसेनेने दुसरा क्रमांक पटकावला आहे. शिंदेंच्या शिवसेनेते तब्बल १९ नगरसेवक बिनविरोध विजयी झाले आहेत. कल्याण-डोंबिवलीत भाजपचे सर्वाधिक १४ उमेदवार तर शिवसेनेचे ६ उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. त्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे २ तर मालेगावमधून इस्लाम पार्टीचा एक उमेदवार बिनविरोध विजयी झाला आहे.

Comments
Add Comment