Mumbai :मुंबईतील एका परिसरात अत्यंत संतापजनक घटना घडली असून, बोलता बोलता वाद झाल्याने एका तरुणावर त्याच्याच मित्राने जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या किरकोळ वादाचा राग मनात ठेवुन आरोपीने थेट मित्रावर हल्ला केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणात १९ वर्षीय तौकीर आरीफ शेख याच्यावर अतिफ शेख याने हल्ला केल्याचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ८जानेवारी रोजी तौकीर आणि त्याच्या मित्रांचा मित्र अतिफ शेख यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला होता. या वादानंतर अतिफने तौकीरला फोन करून धमकी दिली होती, तसेच शिवीगाळ करत परिणामांची चेतावणी दिल्याचा आरोप तक्रारीत नमूद करण्यात आला आहे. १० जानेवारी रोजी रात्री सुमारे १०.३० वाजताच्या सुमारास तौकीर आपल्या नातेवाईकाला सायन सर्कलवर सोडून लालमिट्टी किस्मतनगर परिसरात परत आला होता. तो एका मित्राला भेटण्यासाठी तेथे थांबला असताना अचानक अतिफ शेख तेथे आला. आरोपीने तौकीरला पाहताच शिवीगाळ सुरू केली. तौकीरने परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र अतिफने रागाच्या भरात त्याच्यावर जोरदार हल्ला केला.
या हल्ल्यात आरोपीने तौकीरच्या मान आणि कानावर जोरात चावा घेतल्याचा आरोप असून, त्यामुळे तौकीर गंभीर जखमी झाला आहे. या प्रकारामुळे घटनास्थळी उपस्थित नागरिक घाबरून गेले. तौकीरच्या मदतीला धावून आलेल्या नागरिकांनाही आरोपीने धमकावल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन आरोपी अतिफ शेख याच्याविरोधात गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.