ठाकरे गटाला विसर पडलाय; रवींद्र चव्हाणांची टीका
मुंबई : संयुक्त महाराष्ट्रासाठी १०५ हुतात्म्यांनी दिलेल्या बलिदानावर गोळीबार करण्याचे पाप काँग्रेसचेच आहे, हे इतिहासात नोंदलेले सत्य असूनही ठाकरे गट जाणीवपूर्वक त्याकडे डोळेझाक करत आहे, अशी घणाघाती टीका भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केली. महापालिका निवडणूक प्रचाराच्या सांगतेवेळी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
रवींद्र चव्हाण म्हणाले की, १६ जानेवारी १९५६ रोजी तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी मुंबई केंद्रशासित करण्याची घोषणा केली होती. त्याच पार्श्वभूमीवर संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभी राहिली. या आंदोलनावर गोळीबार करणारे सरकार हे राज्यातही व केंद्रातही काँग्रेसचेच होते, हा सोयीस्कर विसर ठाकरेंना पडतो, असा आरोप त्यांनी केला.
या घटनांतूनच प्रेरणा घेऊन बाळासाहेब ठाकरे यांनी ‘मराठी माणसाच्या न्यायहक्कासाठी’ शिवसेनेची स्थापना केली, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. मात्र आज ठाकरे गट काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसून मराठीचा कैवार घेत आहे, ही मोठी विसंगती असल्याचे रवींद्र चव्हाण म्हणाले.
कोकण रेल्वे आणि विकासाचा मुद्दा
१९९० च्या दशकात कोकण रेल्वे सुरू झाली ती काँग्रेसमुळे नव्हे, तर मधू दंडवते व जॉर्ज फर्नांडिस यांच्यासारख्या द्रष्ट्या नेत्यांमुळे. २०१४ नंतर मात्र भाजप सरकारच्या काळात कोकण रेल्वेवरील स्थानके सुसज्ज झाली आणि परिसराचा कायापालट झाला. काँग्रेसने कोकणासाठी काहीच केले नाही, असा आरोपही चव्हाण यांनी केला.






