Wednesday, January 14, 2026

भारताचे ‘बाहुबली’ यश

भारताचे ‘बाहुबली’ यश

नुकतेच ‘इस्रो’चे प्रचंड क्षमतेचे ‘बाहुबली’ रॉकेट प्रक्षेपित करून देशाने आत्मनिर्भरतेच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले. या प्रक्षेपणाचा लाभ अनेक क्षेत्रांना होणार असून ‘डायरेक्ट-टू-स्मार्टफोन’ ही नवी तंत्रज्ञान प्रणाली कार्यान्वित झाल्यामुळे देश प्रगतिपथावरून वेगाने वाटचाल करू शकणार आहे. शिक्षण, आरोग्य, शेती, व्यापार आदी क्षेत्रांना विनाखंडित इंटरनेट मिळण्याचे अनेक लाभ बघायला मिळतील.

डॉ. दीपक शिकारपूर

भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच ‘इस्रो’ने पुन्हा एकदा जागतिक स्तरावर कर्तृत्वाचा झेंडा फडकावला. २४ डिसेंबर २०२५ रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून एलव्हीएम ३-एम ६ या भारताच्या सर्वात शक्तिशाली रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. प्रचंड क्षमतेमुळे या रॉकेटला ‘बाहुबली’ असे टोपणनाव देण्यात आले. हे केवळ एक रॉकेट प्रक्षेपण नव्हे, तर अंतराळ क्षेत्रातील भारताच्या वाढत्या व्यावसायिक ताकदीचे आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेचे एक जिवंत प्रतीक आहे. या मोहिमेद्वारे अमेरिकेचा ‘ब्लू बर्ड ब्लॉक-२’ हा महाकाय उपग्रह अवकाशात स्थापित करण्यात आला असून त्याचा थेट परिणाम आगामी काळात आपल्या मोबाईल वापरावर होणार आहे. या प्रक्षेपणाचा सर्वात मोठा आणि थेट फायदा सामान्य मोबाईल वापरकर्त्यांना मिळणार आहे. सध्या मोबाईलवर इंटरनेट वापरण्यासाठी आपण जमिनीवरील टॉवर्सवर अवलंबून असतो. मात्र, ब्लू बर्ड ब्लॉक-२ उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणामुळे ‘डायरेक्ट-टू-स्मार्टफोन’ ही नवी तंत्रज्ञान प्रणाली कार्यान्वित होणार आहे. यामुळे सामान्य ४ जी आणि ५ जी स्मार्टफोन्सना कोणत्याही विशेष उपकरणाशिवाय थेट अंतराळातून कनेक्टिव्हिटी मिळेल. यामुळे दुर्गम डोंगरदऱ्या, समुद्र किंवा मोबाईल टॉवर्स लावणे अशक्य असणाऱ्या ठिकाणीही आता हाय-स्पीड ब्रॉडबँड इंटरनेट उपलब्ध होईल. जगातील ‘डिजिटल दरी’ कमी होण्यास मदत होईल आणि ग्रामीण भागातील नागरिकही जागतिक माहिती तंत्रज्ञानाशी जोडले जातील. एलव्हीएम ३-एम ६ ने अवकाशात सोडलेला ब्लू बर्ड ब्लॉक-२ हा उपग्रह एका फिरत्या ‘मोबाईल टॉवर’सारखा काम करतो. सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याचा २२३ चौमीचा विशाल अँटेना. इतका मोठा असल्यामुळेच तो पृथ्वीपासून ५०० ते ६०० किलोमीटर उंचीवरून तुमच्या खिशातील लहानशा मोबाईलमधील कमकुवत सिग्नल पकडून प्रतिसाद देऊ शकतो. पारंपरिक सॅटेलाइट इंटरनेटसाठी घराच्या छतावर एक विशेष ‘डिश’ लावावी लागते; परंतु या तंत्रज्ञानात उपग्रह थेट फोनमधील एलटीई ५जी लहरींशी संवाद साधतो. या मोहिमेचा सर्वात मोठा आणि थेट फायदा व्होडाफोन आयडियाच्या वापरकर्त्यांना मिळण्याची शक्यता आहे.

बीएसएनएल विशेषतः आपत्कालीन सेवा, लष्करी गरजा आणि अतिदुर्गम भागातील नागरिकांसाठी सॅटेलाइट मेसेजग आणि कॉल सेवा सुरू करण्यावर भर देत आहे. रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेल सध्या ‘स्टारलक’ आणि ‘वनवेब’ यांसारख्या सेवांशी स्पर्धा किंवा सहकार्य करण्याच्या तयारीत आहेत. मात्र या सेवा सुरुवातीला ‘फिक्स्ड वायरलेस ॲक्सेस’ यावर केंद्रित असू शकतात. भविष्यात फोनच्या ‘नेटवर्क सेटग्स’मध्ये ‘सॅटेलाइट रोमग’ असा पर्याय दिसू शकेल. तो सुरू केल्यानंतर तुम्ही टॉवरच्या कक्षेबाहेर गेल्यावरही फोन सुरू राहील. ही सेवा प्रामुख्याने समुद्रात मासेमारीसाठी जाणारे कोळी, हिमालयात जाणारे ट्रेकर्स, जंगलातील रिसॉर्टस आणि राष्ट्रीय महामार्गावरील सिग्नल नसणाऱ्या जागांवरून प्रवास करणाऱ्या लोकांसाठी वरदान ठरेल. या तंत्रज्ञानाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे वापरकर्त्याला काहीही नवीन खरेदी करण्याची गरज नाही. म्हणजेच सॅटेलाइट फोन किंवा ‘स्टारलक’सारख्या छतावर बसवण्याच्या अँटेनाची गरज भासणार नाही. सध्याचा ४जी/५जी एलटीई तंत्रज्ञान असणारा स्मार्टफोनच उपग्रहाशी जोडला जाईल. या तंत्रज्ञानामुळे मोबाईल टॉवरची रेंज नसणाऱ्या ठिकाणी तुमचा फोन आपोआप उपलब्ध उपग्रह सिग्नल शोधेल. हे तंत्रज्ञान ‘रोमग’प्रमाणेच काम करेल. या सेवेअंतर्गत सुरुवातीच्या टप्प्यात वापरकर्ते आपत्कालीन एसएमएस, साधे मेसेज आणि व्हॉईस कॉल करू शकतील. लवकरच टेलिकॉम कंपन्या ग्राहकांसाठी ‘सॅटेलाइट ऑन डिमांड’ प्लॅन्स आणू शकतात. उदाहरणार्थ, तुम्ही हिमालयात ट्रेकला जाणार असाल तर काही दिवसांसाठी सॅटेलाइट कनेक्टिव्हिटीचा पॅक घेऊ शकाल. या प्रक्षेपणामुळे देशाच्या कानाकोपऱ्यात हाय-स्पीड इंटरनेट पोहोचेल. शिक्षण आणि आरोग्यासाठी त्याचा फायदा होईल. चक्रीवादळ, पूर आल्यावर जमिनीवरील टॉवर्स कोसळले तरी उपग्रहाद्वारे मिळणारे नेटवर्क बचावकार्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरेल. ग्रामीण भागातील शेतकरी आणि छोटे व्यावसायिक उपग्रहाद्वारे इंटरनेटशी जोडले गेल्यामुळे थेट बाजारपेठेशी संपर्क साधू शकतील. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.

दुसरी बाब म्हणजे आजही ग्रामीण भागातील दुकानांमध्ये नेटवर्क नसल्यास यूपीआय व्यवहार फेल होतात. मात्र ‘बाहुबली’ उपग्रहामुळे मिळणाऱ्या स्थिर नेटवर्कमुळे अगदी दुर्गम भागातील किराणा दुकानातही डिजिटल पेमेंट सहज शक्य होईल. फळे, भाजीपाला, औषधे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेताना ट्रकच्या ट्रॅकसाठी नेटवर्क आवश्यक असते. मात्र महामार्गावरील ‘ब्लॅक स्पॉट’मुळे यात अडचण येते. आता ही अडचणही सुटणार असून रिअल-टाइम ट्रॅकग शक्य होईल. सध्या खेड्यापाड्यातील बरीच मुले यूट्यूब किंवा इतर शैक्षणिक ॲप्सवरून अभ्यास करतात. पण पावसाळ्यात, खराब हवामानात फायबर तुटल्यास यात खंड पडतो. सॅटेलाइट इंटरनेटमुळेही अडचणही दूर होणार आहे. आणखी एक बाब म्हणजे छोट्या शहरांमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची नेहमीच कमतरता असते. असे असताना सॅटेलाइट कनेक्टिव्हिटीमुळे ग्रामीण भागातील रुग्ण मोठ्या शहरातील डॉक्टरांशी व्हिडीओ कॉलद्वारे संपर्क साधू शकतील. वेळीच उपचार मिळून अनेकांचे जीव वाचू शकतील. याबरोबरच सरकारी सेवांमध्येही याची मदत होईल. जसे की, सातबारा उतारा काढणे, आधार अपडेट करणे, पीक विम्याचे अर्ज भरणे अशा कामांसाठी चॉईस सेंटर, ग्रामपंचायतीत इंटरनेट लागते. आता सॅटेलाइटमुळे या सेवांचे सर्व्हर कधीही ‘डाऊन’ राहणार नाहीत. या सेवेचा लाभ होमस्टे आणि हॉटेल व्यवसायालाही होईल. आपल्याकडे कोकण, सह्याद्रीचे गडकिल्ले, गडचिरोलीसारख्या भागांमध्ये पर्यटन वाढत आहे. मात्र सध्या बऱ्याच पर्यटकांना ‘वर्क फ्रॉम होम’ची इच्छा असते. नेटवर्क नसल्यास अशांची अडचण होते. मात्र सॅटेलाइट इंटरनेटमुळे अशा ठिकाणी ‘वर्केशन’ ही संकल्पना रुजेल आणि स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी मिळतील.‘बाहुबली’ रॉकेटची ही झेप भारताच्या कानाकोपऱ्यांतील शेवटच्या माणसाला ‘डिजिटल इंडिया’चा खरा भाग बनवणार आहे. इस्रोचे हे ‘बाहुबली’ प्रक्षेपण भारताला ‘सॅटेलाइट-टू-स्मार्टफोन’ क्रांतीच्या शर्यतीत जगातील आघाडीच्या देशांच्या रांगेत उभे करत आहे.

Comments
Add Comment