Wednesday, January 14, 2026

मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर दुटप्पी!

मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर दुटप्पी!

मोहम्मद कैफ याचे संघ व्यवस्थापनावरही गंभीर आरोप

नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाला एकामागून एक दुखापतींचे धक्के सहन करावे लागत आहेत. रिषभ पंत मालिकेआधीच दुखापतग्रस्त झाला, तर पहिल्या एकदिवसीय सामन्यात वॉशिंग्टन सुंदरला दुखापत झाली. तरीही मुख्य प्रशिक्षक व संघ व्यवस्थापनाने त्याला फलंदाजीला पाठवले आणि त्यांच्या याच निर्णयावर माजी फलंदाज मोहम्मद कैफ संतापला आहे.

सुंदरने त्या सामन्यात ७ चेंडूंत ७ धावा केल्या होत्या. सामन्यानंतर वॉशिंग्टन सुंदरने मालिकेतून माघार घेतली. त्याच्या जागी उर्वरित दोन वन डे सामन्यांसाठी आयुष बडोनीची निवड करण्यात आली. पण, जखमी असूनही सुंदरला फलंदाजी करण्याच्या निर्णयावर राग व्यक्त करताना मोहम्मद कैफने संघ व्यवस्थापन व गौतम गंभीर यांचा दुटप्पीपणा समोर आणला. त्याने शुभमन गिलचे उदाहरण दिले. शुभमन दुखापतग्रस्त झाला तेव्हा गंभीर आणि संघ व्यवस्थापनाने कशा प्रकारने त्याला वाचवले, हे कैफने सांगितले.

‘शुभमन गिल दुखापतग्रस्त झाला ते आठवते का, कोलकाता येथे झालेल्या त्या कसोटीत तो फलंदाजीला आला नव्हता. तो मोठ्या धावसंख्येचा सामना झाला होता आणि गिलने २०-३० धावा जरी केल्या असत्या, तर भारताला विजय मिळवण्यास मदत झाली असती, असे लोकांना वाटत होते. तरीही तो फलंदाजीला आला नाही. त्याची दुखापत आणखी वाढू नये म्हणून त्याला सुरक्षित ठेवले गेले. पण, सुंदरच्या बाबातीत असे का केले नाही? त्यामुळेच सुंदरला फलंदाजीला पाठवण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे मला वाटते. केएल राहूलसोबत धाव घेताना त्याला आणखी त्रास झाला असता,’ असे कैफ म्हणाला.

भारतीय संघाने तो सामना जिंकला असला तरी सुंदरला फलंदाजीला पाठवणे धोक्याचे ठरू शकले असते. तो म्हणाला, तो दुखापतग्रस्त होता आणि तुम्हाला प्रत्येक चेंडूवर फक्त धावा करायच्या होत्या, तर तुम्ही दुसऱ्या एखाद्या खेळाडूला पाठायला हवे होते. एखादा खेळाडू जखमी असताना तुम्ही त्याला फलंदाजीला पाठवून त्याची दुखापत आणखी वाढली असती. चेंडू डीप पॉइंट किंवा स्क्वेअर लेगला गेला, तरी तो दुसरी धाव धावू शकत नव्हता. तो केवळ एकच धाव घेऊ शकत होता. म्हणून मला वाटते तो चुकीचा निर्णय होता. तुम्ही कुलदीप किंवा दुसऱ्या कोणाला पाठवू शकले असता. जेव्हा परिस्थिती टाळण्यासाऱखी नसती तर सुंदरला पाठवणे मी समजू शकत होतो, असेही कैफ म्हणाला.

Comments
Add Comment