Wednesday, January 14, 2026

मतदानाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत वाहतूक नियोजनात बदल; काही मार्गांवर प्रवेश मर्यादित

मतदानाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत वाहतूक नियोजनात बदल; काही मार्गांवर प्रवेश मर्यादित

मुंबई : राज्यातील महानगरपालिका निवडणुकांसाठी उद्या मतदान होणार असून, या प्रक्रियेच्या सुरळीत अंमलबजावणीसाठी मुंबई शहरात वाहतुकीसंदर्भात विशेष नियोजन करण्यात आले आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि निवडणूक यंत्रणेच्या हालचाली सुलभ करण्यासाठी काही भागांतील रस्ते तात्पुरते वापरासाठी बंद ठेवण्यात येणार आहेत.

पोलीस प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारपासूनच काही प्रमुख मार्गांवर वाहतूक नियंत्रण लागू करण्यात आले असून हे निर्बंध शनिवारच्या मध्यरात्रीपर्यंत कायम राहणार आहेत. या कालावधीत वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

दादर पश्चिमेकडील भागात बुधवार १४ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजल्यापासून ते शुक्रवार, १६ जानेवारी रोजी ११ वाजेपर्यंत राव बहादूर एस. के बोले मार्ग, अशोक वृक्ष रोड आणि रानडे रोडवर प्रवेश आणि पार्किंग करण्यास इतर नागरिकांना मनाई करण्यात आली. फक्त रहिवासी आणि अत्यावश्यक सेवेतील वाहनांनाच परवानगी असेल. वरळीतल्या डॉ. ई. मोझेस रोडवर शुक्रवारी (१६ जानेवारी ) सकाळी ५ वाजल्यापासून मध्यरात्रीपर्यंत प्रवेश आणि पार्किंगला बंदी असेल कारण बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या अभियांत्रिकी केंद्रातील स्ट्रॉंग रूममध्ये मतमोजणी सुरु आहे. त्यामुळे प्रवाशांना इतर पर्यायी मार्ग सुचवण्यात आले आहेत.

वरळी येथील जी.एम.भोसले मार्गावर बुधवारी रात्री १२:०१ वाजेपासून गुरुवार मध्यरात्रीपर्यंत इलेक्ट्रॉनिक ईव्हीएम व्होटिंग मशिनचे वितरण आणि संकलन महत्त्वाचे असणार आहेत. सांताक्रूझसह पश्चिम उपनगरांमध्येही अशाच प्रकारचे निर्बंध असतील. सार्वजनिक रस्त्यांजवळील अनेक मतदान केंद्रांमुळे गुरुवारी एनएस रोड क्रमांक ०६ आणि टीपीएस रोड क्रमांक ०३ तात्पुरते बंद राहतील. शुक्रवारी मतमोजणीमुळे सांताक्रूझमधील रिलीफ रोड पूर्णपणे बंद राहील. बृहन्मुंबई महानगर पालिका निवडणूक २०२६ सुरक्षित आणि सुरळीत पार पाडण्यासाठी शहरात २८००० हून अधिक पोलिस कर्मचारी तैनात केले जाणार आहेत. यामध्ये ३००० पोलिस अधिकारी आणि २५००० पोलिस कर्मचारी तैनात केले जाणार आहेत. पश्चिम उपनगरातील सांताक्रूझ परिसरातही मतदान केंद्रांच्या आसपास काही रस्त्यांवर तात्पुरते निर्बंध लागू राहणार आहेत. मतमोजणीच्या दिवशी एका प्रमुख मार्गावर पूर्णतः वाहतूक थांबवण्यात येणार आहे.

दरम्यान, मुंबई महानगरपालिका निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी शहरात मोठ्या प्रमाणावर सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. हजारो पोलीस अधिकारी व कर्मचारी, तसेच विशेष पथके शहराच्या विविध भागांत कार्यरत असतील. नागरिकांनी या कालावधीत प्रशासनाला सहकार्य करावे आणि अडचणीच्या प्रसंगी आपत्कालीन क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा