मुंबई : राज्यभरात महापालिका निवडणुकांचे वातावरण चांगलेच तापले असून, मुंबई महापालिकेच्या (BMC) निकालांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. गुरुवारी, १५ जानेवारी रोजी मुंबई महापालिकेसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, गुरुवारी १६ जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे . पण यंदा मुंबई महापालिकेच्या मतमोजणी प्रक्रियेत एक महत्त्वाचा बदल करण्यात आला असून, त्यामुळे सर्व निकाल एकाच वेळी जाहीर होणार नाहीत.
२०१७ च्या निवडणुकीप्रमाणे यंदा मुंबईतील २२७ प्रभागांची मतमोजणी एकाच वेळी केली जाणार नाही. याऐवजी यंदा मतमोजणी टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे. शुक्रवारी सकाळपासून मतमोजणीला सुरुवात होणार असून, ही प्रक्रिया एकूण पाच टप्प्यांत पार पडणार आहे. प्रत्येक टप्प्यात साधारण ४६ वॉर्डांची मतमोजणी केली जाणार आहे. मुंबई शहरात एकूण २३ मतमोजणी केंद्रांवर ही प्रक्रिया होणार आहे. प्रत्येक केंद्रावर साधारण दहा प्रभागांची जबाबदारी एका मतमोजणी अधिकाऱ्याकडे असणार असली, तरी एका वेळी फक्त दोनच प्रभागांची मतमोजणी केली जाणार आहे. त्यामुळे संपूर्ण मुंबईत एकाच वेळी जास्तीत जास्त ४६ प्रभागांचेच निकाल स्पष्ट होऊ शकणार आहेत.
निवडणूक अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या नव्या पद्धतीमुळे उपलब्ध मनुष्यबळ कमी प्रभागांवर केंद्रित करता येणार असून, मतमोजणी अधिक शिस्तबद्ध, पारदर्शक आणि सुरळीत पार पाडणे शक्य होणार आहे. मात्र, यामुळे सर्व प्रभागांचे कल एकाच वेळी समोर येणार नाहीत. काही वॉर्डांचे निकाल सकाळीच जाहीर होतील, तर काही वॉर्डांचे निकाल दुपारनंतर किंवा संध्याकाळपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. या पाच टप्प्यांच्या फॉर्म्युल्यामुळे यंदा मुंबई महापालिकेच्या अंतिम चित्रासाठी नागरिकांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. कोणत्या प्रभागाचा निकाल आधी आणि कोणाचा उशिरा लागणार, याबाबत मतदारांमध्ये आणि राजकीय पक्षांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. मुंबईच्या सत्तेची चावी कोणाच्या हाती जाणार, हे स्पष्ट होण्यासाठी यंदा संध्याकाळपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.






