मुंबई : बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाने पहिल्याच आठवड्यात प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं असून, घरातील स्पर्धकांच्या वैयक्तिक कथा चर्चेचा विषय ठरत आहेत. सोशल मीडिया विश्वात ओळख निर्माण केलेला करण सोनावणे याने या मंचावर आपला संघर्षाचा प्रवास मोकळेपणाने मांडला.
कलर्स मराठीकडून प्रदर्शित करण्यात आलेल्या एका झलकित करण इतर स्पर्धकांशी संवाद साधताना आपल्या आयुष्यातील कठीण टप्प्यांबद्दल बोलताना दिसतो. लहानपणी आर्थिक अडचणी अनुभवलेल्या करणसाठी कुटुंबाचं सुख हेच सर्वात मोठं ध्येय राहिलं आहे. स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर उभा राहिल्यानंतर पालकांना आनंद देणं हेच आपलं स्वप्न असल्याचं तो सांगतो.
या संवादात करणने पालकांसोबत केलेल्या एका खास प्रवासाचा उल्लेख केला. आयुष्यभर कष्ट केलेल्या आई-वडिलांना वेगळा अनुभव देता आल्याचा आनंद त्याच्या शब्दांत स्पष्ट दिसत होता. त्यांच्या चेहऱ्यावरचा समाधानाचा भाव पाहणं, हाच आपला खरा यशाचा क्षण असल्याचं तो सांगतो.
भूतकाळातील काही आठवणी आजही मनात खोलवर रुजलेल्या असल्याचं करणने स्पष्ट केलं. त्या अनुभवांनी आपल्याला आर्थिक स्थैर्याचं महत्त्व शिकवलं आणि पुढच्या पिढीसाठी सुरक्षित आयुष्य घडवण्याची इच्छा अधिक ठाम केली, असं त्याचं म्हणणं आहे. आनंद आणि समाधान यामागे मेहनत आणि साधनसंपत्तीची भूमिका असते, असा त्याचा स्पष्ट विचारही या चर्चेतून समोर आला.
करणच्या या मनमोकळ्या बोलण्यावर घरातील इतर सदस्यांनीही सहमती दर्शवली. सोशल मीडियावर प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिक्रिया येत असून, अनेकांनी करणच्या प्रामाणिकपणाचं आणि संघर्षातून उभं राहिलेल्या प्रवासाचं कौतुक केलं आहे.