आचारसंहितेतून वाट काढली !
मुंबई : राज्यातील लाडक्या बहिणींना संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर मोठा दिलासा मिळाला असून, यंदाच्या महिन्यातील १५०० रुपयांचा हफ्ता मंगळवारपासून त्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा होऊ लागला आहे. सकाळपासूनच अनेक महिलांच्या मोबाईलवर बँक मेसेज येऊ लागल्याने या योजनेचा लाभ प्रत्यक्षात सुरू झाल्याचे चित्र आहे. राज्यात सध्या महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना आणि आदर्श आचारसंहिता लागू असताना, निवडणूक आयोगाने नियमित लाभ देण्यास परवानगी दिल्यामुळे हा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, एक रकमी तीन हजार रुपये देण्याच्या चर्चांना आयोगाने स्पष्टपणे मज्जाव केल्याने या निर्णयाला राजकीय तसेच प्रशासकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात आदर्श आचारसंहिता लागू आहे. या काळात कोणत्याही नव्या योजना, नवीन लाभार्थी किंवा मतदारांना आकर्षित करणाऱ्या घोषणा करण्यास मनाई असते. याच कारणामुळे ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत जानेवारी महिन्याचा लाभ अग्रिम स्वरूपात देण्यास राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट नकार दिला. मात्र, आधीपासून सुरू असलेल्या आणि नियमित स्वरूपातील लाभ देण्यास आयोगाने परवानगी दिली. त्यामुळे डिसेंबर महिन्याचा १५०० रुपयांचा हफ्ता मंगळवारपासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
आचारसंहितेच्या कात्रित अडकलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेला मर्यादित का होईना, पण मोकळा श्वास मिळाला आहे. तीन हजार रुपयांची अपेक्षा पूर्ण न झाली असली तरी, नियमित १५०० रुपयांचा हफ्ता वेळेत मिळाल्याने अनेक महिलांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. संक्रातीच्या एक दिवस आधी सुरू झालेल्या या निधीवितरणामुळे लाडक्या बहिणी आनंदीत झाल्या आहेत.






