Wednesday, January 14, 2026

आभाची ‘अँट मॅस्कॉट’ यशोगाथा

आभाची ‘अँट मॅस्कॉट’ यशोगाथा

दी लेडी बॉस : अर्चना सोंडे

ऑफीससाठी लागणाऱ्या विविध वस्तूंच्या खरेदीत येणाऱ्या अडचणींवरील एका साध्या चर्चेतून ‘अँट मॅस्कॉट’ या बी२बी ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मचा जन्म झाला. आपल्या पतीसह सुरू केलेला हा उपक्रम आज १६ कोटी रुपयांच्या उलाढालीपर्यंत पोहोचला आहे. ही गोष्ट आहे आभा गुप्ताच्या अँट मॅस्कॉटची.

शिक्षणापासून उद्योजकतेपर्यंतचा प्रवास

बोकारो स्टील सिटी येथील चिन्मय विद्यालयातून आभाचे शालेय शिक्षण झाले. आभाचे वडील विश्वनाथ प्रसाद हे सेलमध्ये कार्यरत होते, तर आई सुमित्रा देवी गृहिणी होत्या. अभ्यासात हुशार असलेली आभा खेळ, गायन आणि इतर उपक्रमांमध्येही सक्रिय होती.

दंत प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होऊनही आभाने रांची येथील सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये वनस्पतीशास्त्रात पदवी घेतली. मार्गदर्शकांच्या सल्ल्याने तिने पुढे बंगळूरु येथील आयबीएसमधून एचआरमध्ये एमबीए पूर्ण केले. कॅम्पस प्लेसमेंटद्वारे तिची फोर्टिस हॉस्पिटल्समध्ये मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून नियुक्ती झाली.

एचआर कारकिर्दीतूनव्यवसायाकडे वळण

फोर्टिसमध्ये काम करताना एचआर हे केवळ भरती आणि पगार व्यवस्थापनापुरते मर्यादित नसल्याचे आभाला जाणवले. उत्कृष्ट कामगिरीमुळे तिची वरिष्ठ कार्यकारी एचआर पदावर बढती झाली. त्यानंतर क्लाउड नाईन हेल्थकेअरमध्ये डेप्युटी मॅनेजर एचआर म्हणून काम करून आभा पुन्हा फोर्टिसमध्ये युनिट एचआर प्रमुख म्हणून परतल्या.

समस्येतून संधीचा शोध

आभा बंगळूरुमध्ये फोर्टिस हॉस्पिटलच्या ग्राउंड-अप प्रोजेक्टमध्ये काम करत होत्या. ऑफिस आणि हॉस्पिटल साहित्याची निवड करताना अनेक त्रुटी आणि अडचणी जाणवत होत्या. या संबंधी त्यांनी पती प्रवीण यांच्याशी चर्चा केली. प्रवीण यांना देखील त्यांच्या नोकरीदरम्यान अशाच समस्यांचा सामना करावा लागत होता. या चर्चेतून असंघटित कॉर्पोरेट सोर्सिंग क्षेत्राला एक संघटित, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित व्यासपीठ देण्याची संधी या जोडप्याला दिसली.

सुरक्षित नोकरीला रामराम

२०१६ मध्ये आभा यांनी फोर्टिस हॉस्पिटल्समधील युनिट एचआर प्रमुखपदाचा राजीनामा दिला. त्यांनी त्यांच्या वैयक्तिक बचतीतील १० लाख रुपये गुंतवून घरातूनच व्यवसाय सुरू केला. त्या काळात अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट हे प्लॅटफॉर्म किरकोळ ग्राहकांसाठी कार्यरत होते. अँट मॅस्कॉटने सुरुवातीपासूनच व्यावसायिक क्षेत्रावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला.

पतीचा व्यवसायात सहभाग

२०१८ मध्ये सॅमसनाईट इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून कार्यरत असलेले प्रवीण यांनी नोकरी सोडून पूर्णवेळ अँट मॅस्कॉटमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या कंपनीत काम करत राहून व्यवसायावर लक्ष केंद्रित करणे योग्य नाही म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला.

‘अँट मॅस्कॉट’ नावामागील अर्थ

सुरुवातीला कॉर्पोरेट गिफ्टिंगपासून सुरू झालेल्या व्यवसायाला ‘अँट मॅस्कॉट’ हे नाव देण्यामागे एक खास विचार होता. मुंग्या कष्टाळू असतात, संघभावनेने काम करतात आणि त्यांच्या वजनाच्या ५० पट वजन उचलू शकतात. तसेच काळ्या मुंग्या समृद्धीचे प्रतीक मानल्या जातात. या सर्व बाबी कंपनीच्या ध्येयधोरणांशी सुसंगत असल्यामुळे पाठीवर गोण्याची पिशवी असलेली मुंगी त्यांचे बोधचिन्ह ठरले.

आव्हाने, कोविड आणि टीमप्रती निष्ठा

विक्रेते किंवा सेल्समन कंपनीमध्ये घेणे. कर्मचारी टिकवणे ही सुरुवातीची मोठी आव्हाने होती. तरीही अँट मॅस्कॉट आदीदास सारख्या ब्रँडचा व्यवसाय भागीदार बनला. मात्र २०२० मध्ये कोविड महामारीने व्यवसायाला मोठा धक्का दिला. मात्र मुंग्या जशा आपल्या कुटुंबातील कोणालाही मागे सोडत नाही. त्याप्रमाणे आभाच्या अँट मॅस्कॉटने कोणत्याही कर्मचाऱ्याला कामावरून काढले नाही किंवा पगारात कपात केली नाही. आज अँट मॅस्कॉटचे ३५० हून अधिक ब्रँड्स ग्राहक आहेत.

गुंतवणूकदारांपासून दूर राहण्याचा निर्णय

गुंतवणूक ऑफर मिळूनही, १ दशलक्ष डॉलर्सच्या बदल्यात ३५–४०% हिस्सा देण्याचे प्रस्ताव या जोडप्याने नाकारले. बी२बी मॉडेलमध्ये नफा मर्यादित असल्याने तो व्हेंचर कॅपिटलसाठी आकर्षक नसतो असे प्रवीण गुप्ता स्पष्ट करतात.

पुढील वाटचाल

४० सदस्यांची टीम, नफ्यात असलेला व्यवसाय आणि १६ कोटी रुपयांची उलाढाल असलेला अँट मॅस्कॉट पुढील आर्थिक वर्षात २५ कोटींचे लक्ष्य गाठण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. असंघटित असलेल्या व्यावसायिक क्षेत्रातील बाजारात प्रचंड संधी असल्याचा विश्वास या उद्योजक जोडप्याला आहे.

प्रत्येक क्षेत्रात उद्योगांची संधी असते फक्त ती हेरता आली पाहिजे. त्याचसोबत नियोजन, योजनाबद्ध कृती आणि आपल्या माणसांचा पाठिंबा असेल तर काहीही साध्य करता येते हे आभा गुप्ता यांच्या अँट मॅस्कॉटने सिद्ध केले आहे.

Comments
Add Comment