मुंबई : यंदा मकरसंक्रांत बुधवार १४ जानेवारी २०२६ रोजी आहे. या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करेल. या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होईल. काही ठिकाणी मकरसंक्रांतीला 'उत्तरायण' असे म्हणतात तर काही ठिकाणी 'खिचडी' असेही म्हणतात. मकरसंक्रांतीनिमित्त पवित्र नदीत स्नान करतात नंतर सूर्यदेवाची उपासना करतात.
सूर्याने मकर राशीत प्रवेश करताच महिनाभर सुरू असलेला खरमास संपतो. पुन्हा एकदा शुभ कार्यांचा काळ सुरू होतो. ऋतू परिवर्तन होते. वातावरणातील थंडावा हळू हळू कमी होऊ लागतो. वसंत ऋतूची सुरुवात होते.
मकरसंक्रांतीनिमित्त अनेक ठिकाणी स्नान करुन सूर्याची उपासना केल्यानंतर खिचडी खाणे, खिचडी दान करणे असे केले जाते. या दिवशी खिचडीचे दान केल्याने ग्रहदोष शांत होतात आणि जीवनात स्थैर्य येते, अशी अनेकांची श्रद्धा आहे.
अशी तयार करतात मकरसंक्रांतीनिमित्त खायची मुगाची खिचडी ?
साहित्य : मूग डाळ, तांदूळ, तूप, जीरे, हिंग, धने पूड, चवीपुरते मीठ
पाककृती :
- तांदूळ आणि मूग डाळ धुवा. किमान अर्धा तास पाण्यात भिजत ठेवा.
- तांदूळ आणि डाळीतील पाणी गाळून घ्या.
- पॅनमध्ये तूप गरम करून त्यात जीरे आणि हिंगाची फोडणी द्या.
- जीरे तडतडू लागले की त्यात तांदूळ आणि मूगडाळ मिक्स करून चांगले परतून घ्या.
- भांड्यामध्ये पाणी ओता आणि तापवा. पाणी पूर्णपणे आटू देऊ नका. नंतर त्यात धने पूड आणि मीठ टाका.
- भांड्यावर झाकण ठेवा. नंतर मंद आचेवर खिचडी किमान दहा मिनिटे शिजवा.