मुंबई : हिंदू धर्मामध्ये मकरसंक्रांतीच्या सणाला विशेष महत्त्व आहे. मकरसंक्रांत हा सण दरवर्षी १४ किंवा १५ जानेवारीला येतो. यंदा हा सण बुधवार १४ जानेवारी २०२६ रोजी साजरा होत आहे. या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो, म्हणूनच याला मकरसंक्रांत असे म्हणतात. या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. पृथ्वी सूर्याभोवती फिरत असताना तिचा अक्ष कललेला असतो, त्यामुळे मकरसंक्रांतीपासून उत्तर गोलार्धात सूर्याची किरणे अधिक काळ पडू लागतात. दिवस मोठा आणि रात्र लहान होऊ लागते. जाणून घ्या मकरसंक्रांतीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये ?
यंदा बुधवार १४ जानेवारी २०२६ रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे दुपारी तीन वाजून सहा मिनिटांपासून ते सूर्यास्तापर्यंतचा काळ हा पुण्यकाळ आहे.
मकरसंक्रांतीच्या दिवशी ओळखीतल्या व्यक्तींना तसेच ज्यांच्याशी नव्याने ओळख करुन घेत आहात अशा सर्वांना तिळगूळ द्या. तिळगूळ देताना "तिळगूळ घ्या, गोड गोड बोला" असे म्हणा. सर्व जुने वाद, कटुता आणि राग विसरून सर्वांशी प्रेमाने आणि गोडव्याने वागा.
शक्य असल्यास सूर्याने मकर राशीत प्रवेश केल्यानंतर तीळ मिश्रीत पाण्याने स्नान करा. हे स्नान करण्याआधी तिळाच्या तेलाने शरीराला मालीश करा तसेच तीळ मिश्रीत उटणे शरीराला लावा. नंतर स्नान करा. स्नान केल्यानंतर इष्ट देवतेचे स्मरण करा. शक्य असल्यास चालत जवळच्या मंदिरात जाऊन देवदर्शन करा. यानंतर यथाशक्ती दानधर्म करा. शक्य असल्यास रक्तदान करा.
मकरसंक्रांतीच्या दिवशी काय करू नये ?
कठोर बोलू नये. वाद घालू नये. कटुता निर्माण होईल असे वागू नये. कोणावरही संतापू नये. वृश्रतोड करू नये. प्राणीपक्षी यांना त्रास देऊ नये. शरीराला अपायकारक असलेली व्यसनं करू नये.
लक्षात ठेवा
मकरसंक्रांत हा सण आहे. हा सण आनंदाने आणि उत्साहाने साजरा करा. सूर्याचा मकर राशीतला प्रवेश तसेच दिवस मोठा होणे आणि रात्र लहान होणे हे एक निसर्गचक्र आहे. यात काहीही अशुभ असे नाही.






