Tuesday, January 13, 2026

सूर्या प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून पाणीपुरवठा सुरू

सूर्या प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून पाणीपुरवठा सुरू

उजव्या तीर कालव्यावरील दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात

पालघर :सूर्या प्रकल्पांतर्गत डहाणू व पालघर तालुक्यातील शेतकऱ्यांना उन्हाळी हंगामात मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला असून डाव्या तीर मुख्य कालव्यातून शेतीसाठी पाणीपुरवठा ३० डिसेंबरपासून सुरू करण्यात आला आहे. उजव्या तीर कालव्यावरील दुरुस्ती व अस्तरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून पुढील दोन दिवसांत त्या कालव्यातूनही पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे. सूर्या प्रकल्पाच्या डाव्या तीर मुख्य कालव्याच्या पहिल्या टप्प्यातील १ ते ७ किलोमीटर अंतराचे अस्तरीकरण पूर्ण झाले आहे. या दुरुस्तीमुळे कालव्याच्या पाण्याच्या प्रवाहाला लक्षणीय गती मिळाली असून सध्या कालव्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत पाणी पोहोचणे शक्य झाले आहे. परिणामी डहाणू व पालघर तालुक्यातील अनेक गावांमधील शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक पाणी उपलब्ध होऊ लागले आहे.

दरम्यान, उजव्या तीर कालव्यावर सुरू असलेल्या दुरुस्ती व अस्तरीकरणाच्या कामामुळे सध्या त्या कालव्यातील पाणीपुरवठा तात्पुरता बंद ठेवण्यात आला आहे. हे काम पूर्ण होताच दोन दिवसांत उजव्या कालव्यातूनही पाणी सोडण्यात येईल, असे पाटबंधारे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.डाव्या तीर मुख्य कालव्याची एकूण लांबी सुमारे २९ किलोमीटर असून त्यापैकी पहिल्या ७ किलोमीटरचे अस्तरीकरण पूर्ण झाले आहे. तसेच उजव्या तीर कालव्याची एकूण लांबी ३३ किलोमीटर असून या कालव्याच्या देखील पहिल्या १ ते ७ किलोमीटर टप्प्यातील काम पूर्ण झाले आहे. उर्वरित टप्प्यांसाठी आवश्यक काम प्रस्तावित असून ते पूर्ण झाल्यानंतर पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा सुरू करण्यात येणार आहे. मुख्य कालव्यावरून शेतीसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या लघु कालव्यांची दुरुस्ती, गाळ काढणे आणि पाणी वहन क्षमता वाढविण्याची कामेही हाती घेण्यात आली आहेत. या उपाययोजनांमुळे कालव्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचेल, असा विश्वास पाटबंधारे विभागाने व्यक्त केला आहे. कालव्यांच्या दुरुस्तीमुळे यंदाच्या उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली असून पाणीपुरवठा सुरळीत झाल्यास शेती उत्पादनात वाढ होईल, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment