Tuesday, January 13, 2026

मराठी माणसाच्या नावावर राजकारण करणाऱ्यांनी आधी इतिहासात डोकवावं आणि वर्तमानात पाहावं.….. - भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

मराठी माणसाच्या नावावर राजकारण करणाऱ्यांनी आधी इतिहासात डोकवावं आणि वर्तमानात पाहावं.….. - भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

मुंबई :  संयुक्त महाराष्ट्रासाठी १०५ हुतात्म्यांनी जे रक्त सांडले, त्या आंदोलनावर गोळ्या झाडण्याचं पाप काँग्रेसचं आहे, हे इतिहासात नोंदलेलं सत्य आहे. सत्तर वर्षांपूर्वी १६ जानेवारी १९५६ रोजी नेहरूंनी मुंबई केंद्रशासित करण्याची घोषणा केली होती. त्या घटनेतून प्रेरित होऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना ही ‘मराठी माणसाच्या न्यायहक्कासाठी’ केली, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. उबाठा गटातील नेते जाणीवपूर्वक एक गोष्ट विसरतात की संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलकांवर गोळीबार करणारे त्यावेळी महाराष्ट्रात मुख्यमंत्री काँग्रेसचे होते आणि केंद्रातही काँग्रेसचेच सरकार होते याचा त्यांना सोयीस्कर विसर पडतो आणि आज काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसताना ते उबाठा गट मराठीचा कैवार घेत आहेत, ते काँग्रेसची बंदूक स्वतःच्या खांद्यावर घेऊन अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केली आहे. महापालिका निवडणूक प्रचार सांगता करताना ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

काँग्रेसच्या पाठिंब्यावर उद्धव ठाकरे यांनी स्वतःचं सरकार स्थापन करण्याचे पाप केले आणि १०५ हुतात्म्यांचा अपमान केला. केवळ स्वतःचे दुकान चालू ठेवण्यासाठी काँग्रेसशी हातमिळवणी करताना उद्धव ठाकरे यांना मराठी अस्मितेचा सोयीस्कर विसर पडला, हे महाराष्ट्रातील जनतेनं पाहिलं आहे असं रविंद्र चव्हाण म्हणाले.

१९९० च्या दशकात कोकणात रेल्वे आली, पण तेव्हा काँग्रेस सत्तेत नव्हती. तर मधू दंडवते आणि जॉर्ज फर्नांडिस यांच्यासारख्या द्रष्ट्या नेत्यांच्या प्रयत्नातून कोकण रेल्वे सुरू झाली होती. तर आज २०१४ पासून कोकण रेल्वेवरील अनेक स्थानकं आणि परिसराचा कायापालट होत आहे, ती सुसज्ज झाली आहेत ती भाजप सरकारच्या काळात. काँग्रेस सत्तेत असताना या कोकणासाठी त्यांनी काही केले नाही मात्र त्याच कोकणी माणसांच्या पाठिंब्यावर घेऊन उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पद पदरात पाडून घेतले ते मात्र काँग्रेसच्या कुबड्या घेऊनच असा मुद्दा रविंद्र चव्हाण यांनी उपस्थित केला.

उबाठा सेना आणि मनसे हे इतरांपेक्षा जास्त मराठीचे कैवारी कसे काय झाले आहेत? याचं उत्तर शोधण्याचा कुणी प्रामाणिक प्रयत्न केला आहे का? असा सवाल करत चव्हाण म्हणाले की इथे जन्मलेला अमराठी भाषिक “आपण अमराठी आहोत म्हणून भाजपात जाऊ” असा विचार करून भाजपात येत नाही. तर इतर पक्षांमध्ये नेतृत्व, विचारधारा आणि भवितव्य मर्यादित आहे, म्हणून तो भाजपात येतो, हे वास्तव आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की भाजपाने मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि मराठी माणसासाठी ठोस काम केलं आहे.मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या नेत्यांनी सातत्याने केंद्र सरकारच्या पातळीवर पाठपुरावा केला. अभिजात भाषेचा दर्जा माझ्या माय मराठीला मिळाला तो फडणवीस यांच्या पाठपुराव्यामुळेच हे मान्य करावेच लागेल.

एका प्रश्नावर उत्तर देताना रविंद्र चव्हाण यांनी स्पष्ट केलं की मुंबईतील BDD चाळींमधल्या मराठी बांधवांना हक्काचं घर मिळालं ते केवळ देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं पुढाकार घेतल्याने शक्य झालं आहे. कारण निवडणूक आली की ठाकरेंना मराठी माणूस आठवतो, नाहीतर ५ वर्षे ते मराठी हा शब्द पण विसरलेले असतात. महापालिकेची कंत्राटे देताना उद्धव ठाकरे यांना परप्रांतीय कॉन्ट्रॅक्टरच लागतात, पण गेल्या ३० वर्षात मुंबईतील मराठी माणसासाठी त्यांनी नेमकं काय केलं आहे हे जाहीररीत्या सांगण्याचे धाडस करावे असं आव्हान त्यांनी उबाठा सेनेला दिलं.

भाजपाचे मराठी संस्कृतीतील स्थान या संदर्भात बोलताना रविंद्र चव्हाण यांनी सांगितले की आज संपूर्ण देशात ज्याच्या अत्यंत गौरवाने उल्लेख केला जातो ती गुढी पाडव्याची भव्य हिंदू नववर्ष शोभायात्रा ही डोंबिवलीतील संघ–भाजप कार्यकर्त्यांचीच संकल्पना आहे, जी आज संपूर्ण महाराष्ट्राला प्रेरणादायी ठरली आहे. पुढे ते म्हणाले की “तुम्ही म्हणजे मराठी माणूस नाही आणि तुम्ही म्हणजे मुंबई नाही.” याचा उल्लेख वारंवार देवेंद्रजी करतात मात्र हे सत्य स्वीकारण्याची मानसिकता आणि वैचारिक तयारी उबाठा नेत्यांची नाही हे दुर्दैव आहे.

शिवसेनेची “मी मराठी” ही ओळख बदलून “मी मुंबईकर” ही संकल्पना मुंबईतील मराठी माणसाच्या डोक्यावर कोणी लादली ? मुंबईची मराठी ओळख पुसण्याचे पातक "मी मुंबईकर"च्या मोहिमेतून उद्धव ठाकरे यांनीच केले आणि हे बदल बाळासाहेब ठाकरे यांना मान्य होते का? याचं प्रामाणिक उत्तर देखील उद्धव ठाकरे यांनी द्यावं. मराठी माणसाचा सन्मान, भाषा, संस्कृती आणि भवितव्य यावर केवळ भावनांचे बुडबुडे निर्माण करण्यापेक्षा, यासर्व गोष्टींसाठी घोषणांपेक्षा काय काम केले आहे ते महत्त्वाचं असतं, आणि ते काम फक्त भाजपानेच करून दाखवलं आहे , हे देखील सुर्यप्रकाशा इतके स्वच्छ आहे असा युक्तिवाद प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केला

Comments
Add Comment