“गरिबांच्या घरांचे स्वप्न आम्हीच पूर्ण करणार” — मुंबई महापालिका प्रचारात शिंदेंचा थेट इशारा
दहिसर, बोरीवली, मागाठाणे, कांदिवली, मालाड, दिंडोशी आणि जोगेश्वरीतील प्रचार दौऱ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबई : “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे गरिबांना, कष्टकरी व मुंबईकरांना हक्काची घरे देण्याचे स्वप्न होते. मात्र त्यांचा वारसा सांगणारेच हे स्वप्न विसरले आहे. ते स्वप्न पूर्ण करण्याचे काम आम्ही करणार आहोत,” असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील दहिसर, बोरीवली, मागाठाणे, कांदिवली, मालाड, दिंडोशी आणि जोगेश्वरी मतदारसंघांत महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभांमध्ये ते बोलत होते. या प्रचार दौऱ्याला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून ठिकठिकाणी कॉर्नर सभांचे आयोजन करण्यात आले होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, महायुती सरकार सर्वसामान्य, गोरगरीब, झोपडपट्टीत राहणारे, गिरणी कामगार आणि भूमिपुत्रांसाठी काम करत आहे. मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्याच्या दिशेने सरकार ठोस पावले उचलत असून रमाबाई आंबेडकर नगरसह विविध ठिकाणी पुनर्विकास प्रकल्प वेगाने सुरू आहेत.
मुंबई आणि एमएमआर परिसरात गरिबांना आणि कष्टकरी वर्गाला घरे उपलब्ध करून देण्याचे काम सुरू असून अनेक वर्षांपासून रखडलेले प्रकल्प आता मार्गी लागत असल्याचे त्यांनी सांगितले. पूर्वी केवळ घोषणा झाल्या, मात्र प्रत्यक्षात काम झाले नाही. आम्ही मात्र प्रत्यक्ष काम करून नागरिकांना लाभ देत असल्याचा दावा त्यांनी केला.
महायुती सरकारने सुरू केलेल्या “लाडकी बहीण” योजनेमुळे महिलांना व कुटुंबांना आर्थिक आधार मिळत असून ही योजना बंद होणार नसल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले. मुंबई महानगरपालिकेमार्फत झोपडपट्टी पुनर्वसन, पाणीपुरवठा, स्वच्छता, उद्याने, आरोग्य सुविधा तसेच काँक्रीट रस्त्यांची कामे प्राधान्याने केली जातील, असे ठोस आश्वासनही त्यांनी दिले.
महायुतीशिवाय मुंबईच्या विकासाला पर्याय नसल्याचे सांगत मुख्यमंत्री शिंदे यांनी महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी खासदार रवींद्र वायकर,आमदार प्रकाश सुर्वे, शिवसेना प्रवक्त्या सौ. शीतल म्हात्रे आणि शिवसेनेचे सर्व उमेदवार, प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






