मुंबई : 'ठाकरे बंधूंची भाषा आणि जिहाद्यांच्या भाषेत आता काहीच फरक उरलेला नाही. 'व्होट जिहाद'च्या माध्यमातून हिंदू समाजाला डिवचण्याचे काम सुरू असून, राष्ट्रभक्त हिंदूंनी जागरूक राहून मतदानातून या प्रवृत्तींना धडा शिकवावा", असे आवाहन मंत्री नितेश राणे यांनी मंगळवारी केले.
नितेश राणे म्हणाले की, लोकसभेपासून सुरू झालेला धर्माच्या नावावर मते मागण्याचा प्रकार आता महानगरपालिका निवडणुकांपर्यंत पोहोचला आहे. जर चुकूनही यांच्या विचारांचा महापौर खुर्चीवर बसला, तर मुंबई-ठाण्याचे पूर्णपणे 'हिरवेकरण' होईल. सगळीकडे पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा आणि 'सर तन से जुदा'चे नारे ऐकू येतील. इतकेच नाही तर, सत्ता त्यांच्या हातात गेली तर उद्या मुंबई-ठाण्यात सण-उत्सव साजरे करणेही कठीण होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
ठाकरे गटावर दुटप्पीपणाचा आरोप करताना राणे म्हणाले, "एकीकडे संविधानाची भाषा करायची आणि दुसरीकडे बुरखेवाला महापौर करण्याची स्वप्ने पाहायची, हे अत्यंत दुर्दैवी आहे. तुम्हाला इथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान हवे आहे की शरिया कायदा लागू करायचा आहे?" असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
भेंडी बाजारात बोगस मतदार शोधा
बोगस मतदारांचे पाय तोडण्याची भाषा करणाऱ्या ठाकरे बंधूंना राणे यांनी खुले आव्हान दिले. ते म्हणाले की, "जर हिंमत असेल तर आधी भेंडी बाजार, नळ बाजार आणि बेहराम पाडा यांसारख्या मोहल्ल्यांमध्ये जाऊन उभे राहा. तिथे एकाच व्यक्तीने बुरखा घालून १५-१५ वेळा मतदान केल्याचा इतिहास आहे. खऱ्या अर्थाने बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्व मनात असेल, तर तिथे जाऊन बोगस मतदान रोखून दाखवा", असे आव्हान देखील नितेश राणे यांनी दिले.






