Tuesday, January 13, 2026

ताजमहालचे तळघर उघडणार! ३ दिवस मोफत पाहण्याची संधी

ताजमहालचे तळघर उघडणार! ३ दिवस मोफत पाहण्याची संधी

उर्सच्या कालावधीत पर्यटकांना आणि भाविकांना विशेष सवलती

आग्रा: जगातील सातवे आश्चर्य मानल्या जाणाऱ्या ताजमहालमध्ये लवकरच मुघल सम्राट शहाजहान यांचा ३७१ वा उर्स साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने १५ ते १७ जानेवारी २०२६ दरम्यान पर्यटकांसाठी ताजमहालचे दरवाजे विनामूल्य उघडले जातील. विशेष म्हणजे, वर्षभरातून केवळ या ३ दिवसांसाठीच ताजमहालच्या तळघरात असलेल्या शहाजहान आणि मुमताज महल यांच्या मूळ कबरी पर्यटकांना पाहता येणार आहेत. भारतीय पुरातत्त्व विभागाने (एएसआय) जारी केलेल्या आदेशानुसार, उर्सच्या कालावधीत पर्यटकांना आणि भाविकांना विशेष सवलती दिल्या जाणार आहेत. मूळ कबरी पाहण्याची एकमेव संधी ताजमहालच्या मुख्य घुमटात पर्यटकांना ज्या दोन कबरी दिसतात, त्या केवळ प्रतिकृती आहेत. खऱ्या कबरी या मुख्य वास्तूच्या खाली असलेल्या तळघरात आहेत. सुरक्षा आणि संवर्धनाच्या कारणास्तव हे तळघर वर्षभर बंद असते, परंतु उर्सच्या या ३ दिवसांत ते सर्वसामान्य लोकांसाठी उघडले जाते. भाविक आणि पर्यटकांना या मूळ कबरींचे दर्शन घेता यावे, ही या महोत्सवाची मोठी जमेची बाजू आहे. १० डिसेंबर २०१८ पासून, मुख्य घुमटात गर्दीचे नियोजन करण्यासाठी पुरत्त्त्व विभागाने २०० रुपयांचे अतिरिक्त शुल्क लागू केले होते. मात्र, उर्सच्या या तीन दिवसांत हे अतिरिक्त शुल्क देखील आकारले जाणार नाही. म्हणजेच कोणताही पर्यटक विनातिकीट मुख्य थडग्यापर्यंत जाऊ शकेल. मोफत प्रवेशामुळे होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता, आग्रा पोलीस आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (CISF) कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. ताजमहालच्या पूर्व आणि पश्चिम प्रवेशद्वारांवर अतिरिक्त तपासणी यंत्रणा बसवण्यात आली असून, पर्यटकांनी शिस्त पाळावी असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रवेशाचे सविस्तर वेळापत्रक

१५ जानेवारी (गुरुवार) : उर्सच्या पहिल्या दिवशी दुपारी २.०० वाजेपासून ते सूर्यास्तापर्यंत ताजमहालमध्ये मोफत प्रवेश दिला जाईल. या दिवशी 'गुस्ल' हा पारंपरिक विधी पार पडणार आहे. १६ जानेवारी (शुक्रवार) : सामान्यत : शुक्रवारी ताजमहाल साप्ताहिक सुट्टीसाठी बंद असतो आणि केवळ स्थानिक नमाज पठण करणाऱ्यांनाच प्रवेश दिला जातो. मात्र, उर्सनिमित्त दुपारी २.०० वाजल्यानंतर सर्व पर्यटकांना सूर्यास्तापर्यंत विनामूल्य प्रवेश मिळेल. या दिवशी 'संदल' विधी पार पडेल. १७ जानेवारी (शनिवार) : उर्सच्या शेवटच्या दिवशी म्हणजे १७ जानेवारीला सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत संपूर्ण दिवसभर प्रवेश विनामूल्य असेल. या दिवशी मुख्य आकर्षण असलेली १७२० मीटर लांब सतरंगी चादर अर्पण केली जाणार आहे.
Comments
Add Comment