Tuesday, January 13, 2026

परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून 'सेल ऑफ',शेअर बाजारात अस्थिरतेचे स्तोम! सेन्सेक्स २८७.८८ अंकाने व निफ्टी ५७.९५ अंकांने घसरला

परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून 'सेल ऑफ',शेअर बाजारात अस्थिरतेचे स्तोम! सेन्सेक्स २८७.८८ अंकाने व निफ्टी ५७.९५ अंकांने घसरला

मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात अखेरच्या सत्रात घसरण झाली आहे. अखेर सेन्सेक्स २८७.८८ अंकाने घसरत ८३५९०.२९ पातळीवर स्थिरावला असून निफ्टी ५७.९५ अंकाने घसरत २५७३२.३० पातळीवर स्थिरावला आहे. युएस भारत यांच्यातील द्विपक्षीय कराराबाबत अनिश्चितता कायम असताना दुसरीकडे मोठ्या प्रमाणात नफा बुकिंगसह बाजारातील सेल ऑफ परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी कायम ठेवले. कमोडिटी बाजारातील तुफान वाढ, रूपयात झालेली किरकोळ घसरण, इराण युएस यांच्यातील युद्धजन्य परिस्थिती अशा अनेक कारणांमुळे शेअर बाजाराला संतुलन राखण्यास अपयश आले असले तरी दुसरीकडे तिमाहीतील चांगल्या कामगिरीमुळे उसळलेल्या बँक निर्देशांकामुळे बेंचमार्क निर्देशांकाची पडझड कमी झाली. दरम्यान मिडकॅपसह स्मॉलकॅप शेअर्समध्येही घसरण कायम राहिली आहे. आयटी शेअर्समध्ये सु़धारित तिमाही निकालामुळे झालेल्या वाढीमुळे वाढ झाली असताना उर्वरित मिडिया, पीएसयु बँक, फायनांशियल सर्विसेस एक्स बँक, केमिकल्स या निर्देशांकात सर्वाधिक वाढ झाली आहे. तर सर्वाधिक घसरण कंज्यूमर ड्युरेबल्स, तेल व गॅस फार्मा, एफएमसीजी, रिअल्टी, हेल्थकेअर निर्देशांकात झाली होती.

युएस बाजारातील आज संभाव्य सीपीआय आकडेवारीसाठी युएसमधील गुंतवणूकदार वाट पाहत असताना जागतिक संमिश्रित कलाने बाजारात गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला होता. त्याचाच भाग म्हणून गुंतवणूकदारांनी कमोडिटी बाजारातील आपले हेजिंग वाढवले होते.याशिवाय डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणशी व्यापार करणाऱ्या देशांवर २५% अतिरिक्त टॅरिफची घोषणा केल्यानंतर बाजारात अस्थिरता कायम होती.मात्र तरीही तेजीचा अंडरकरंट कायम असल्याने घरगुती गुंतवणूकदारांनी आपल्या गुंतवणूकीत वाढ केल्याचे दिसून येत आहे. परिणामी वाढलेल्या एफपीआय (Foreign Portfolio Investor) यांच्या सेल ऑफ नंतरही बाजारात काही प्रमाणात स्थिरता आली उदाहरणार्थ सकाळच्या सत्रात अस्थिरता निर्देशांक २% पेक्षा अधिक उसळला असताना बंद होताना मात्र १% पेक्षा कमी पातळीवर घसरला आहे. अखेरच्या सत्रात आशियाई बाजारातील तेजीयुक्त संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. गिफ्ट निफ्टीसह सेट कंपोझिट, शांघाई कंपोझिट बाजारातील अपवाद वगळता इतर सगळ्या शेअर बाजारात वाढ झाली आहे ज्यामध्ये सर्वाधिक वाढ निकेयी २२५, कोसपी, जकार्ता कंपोझिट, हेंगसेंग बाजारात झाली आहे. युएसमधील सुरूवातीच्या कलात एस अँड पी ५००, नासडाक बाजारात वाढ झाली असून डाऊ जोन्समध्ये मात्र घसरण झाली आहे.

अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ औथम इन्व्हेसमेंट (८.१०%), महाराष्ट्र स्कूटर (६.२८%), मोतीलाल ओसवाल फायनान्स (५.५३%), पीव्हीआर आयनॉक्स (५.३५%), मन्नपूरम फायनान्स (५.०४%), सिटी युनियन बँक (४.९०%), रेडिको खैतान (३.६०%) समभागात झाली असून सर्वाधिक घसरण डिक्सन टेक्नॉलॉजी (४.९२%), एचईजी (४.५९%), ग्राफाईट इंडिया (३.८२%), वोडाफोन आयडिया (३.६४%), अपार इंडस्ट्रीज (३.७२%), सोलार इंडस्ट्रीज (२.५५%), सारडा एनर्जीज (२.३६%) समभागात झाली आहे.

आजच्या बाजारातील बँक निफ्टीवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे तांत्रिक विश्लेषक वत्सल भुवा म्हणाले आहेत की,' दैनंदिन चार्टवर (Daily Chart) निर्देशांक त्याच्या घसरत्या ट्रेंडलाइन सपोर्ट तसेच २० दिवसीय आणि ५० दिवसीय एसएमएच्या (Simple Moving Average SMA) वर व्यवहार करत आहे, जे सुधारलेली रचना दर्शवते. तासाभराचा आरएसआय बुलिश क्रॉसओव्हरमध्ये दाखल झाला आहे, तर दैनंदिन आरएसआयने अद्याप याची पुष्टी केलेली नाही, जे सावध आशावाद सूचित करते. २० दिवसीय एसएमए सध्या एक मजबूत सपोर्ट झोन म्हणून काम करत आहे. तात्काळ सपोर्ट ५९३०० पातळीवर आहे, तर प्रतिरोध (Resistance) ५९८०० पातळीवर आहे, आणि पोझिशनल सपोर्ट ५९००० पातळीवर आहे. जर निर्देशांक पुढील २-३ सत्रांसाठी २० दिवसीय एसएमएच्यावर टिकून राहिला, तर ६०२०० पातळीच्या दिशेने वाटचाल अपेक्षित आहे.'

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा