कल्याण : कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलीस स्टेशन परिसरात आज तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. २१ वर्षीय एअर होस्टेस तरुणीने प्रेमसंबंधातील छळ आणि फसवणुकीला कंटाळून २८ डिसेंबर २०२५ रोजी आत्महत्या केली होती. तरुणीच्या कुटुंबीयांनी कल्याण कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता, मात्र आरोपीला अटक करण्यात पोलीस अपयशी ठरले असे त्यांनी आरोप केले आहेत. प्रकरणातील आरोपी कौशिक पावशे, अपक्ष उमेदवार अनंता पावशे यांचा पुतण्या असून, आज त्यांच्या प्रचारार्थ परिसरात फिरत असल्याचे कुटुंबीयांनी पाहिले. संतप्त कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात घेराव घालून जोरदार गोंधळ घातला आणि आरोपीला अटक करण्याची मागणी केली.
पोलीस माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी कौशिक यांचे संबंध २०२० पासून होते. आरोपीने विवाहाचे वचन देऊन तिच्यावर शारीरिक अत्याचार, मारहाण, धमक्या आणि आर्थिक पिळवणूक केली. तरुणीच्या शरीरावर दिसणारे मारहाणीचे जखमा, बँक स्टेटमेंटवरील रक्कम हस्तांतरण आणि तिच्या पाठवलेल्या व्हॉट्सॲप मेसेजमध्ये छळाचे तपशील यामुळे आरोपीच्या कृत्यांचे पुरावे स्पष्ट झाले आहेत असे तरुणीचे कुटुंबीय सांगत आहेत. पोलीसांना माहिती देऊनसुद्धा कारवाई न झाल्यामुळे ४० ते ५० नागरिक, महिला आणि कुटुंबीय पोलीस ठाण्यात दाखल झाले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत गुरव यांना घेराव घालत, तब्बल अर्धा तास गोंधळ झाला, तसेच अधिकाऱ्यांच्या गाड्याही अडवल्या.
संतप्त वातावरण पाहता पोलीसांनी आरोपी शोधण्यासाठी विशेष पथक रवाना केले असून, आरोपीच्या आईला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. नागरिक आणि कुटुंबीय तातडीने आरोपीला अटक होण्याची मागणी करत आहेत, तर कल्याण पूर्व परिसरात तणावाचे वातावरण कायम आहे. पुढील कारवाईसाठी सर्वांचे लक्ष पोलीस प्रशासनाकडे लागले आहे.






