Tuesday, January 13, 2026

पालघर नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी राजेंद्र पाटील

पालघर नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी राजेंद्र पाटील

तीन स्वीकृत सदस्यांचीही निवड

पालघर :पालघर नगर परिषदेच्या उपाध्यक्ष पदासाठी सोमवारी घेण्यात आलेल्या विशेष सभेत राजेंद्र आत्माराम पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच स्वीकृत नगरसेवक म्हणून शिवसेनेच्या ॲड. धर्मेंद्र भट्ट व रवींद्र म्हात्रे यांची तर भाजपकडून जयेश आव्हाड यांची निवड करण्यात आली आहे. पालघर नगर परिषदेच्या झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना (शिंदे) गटाचे १९ नगरसेवक निवडून आले आहेत. भाजपचे ८, तर उबाठा गटाचे ३ नगरसेवक निवडून आले आहेत. नगराध्यक्षपदी शिवसेनेचे उत्तम घरत निवडून आले आहेत. दरम्यान, शिवसेना (शिंदे) पक्षाकडून माजी नगराध्यक्ष डॉ. उज्ज्वला काळे यांची गटनेतापदी निवड करण्यात आली आहे. उपनगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेकडून चंद्रशेखर वडे व राजेंद्र पाटील यांची नावे चर्चेत होती.

राजेंद्र पाटील यांच्या नावाला पसंती देण्यात आली आहे. शिवसेना (शिंदे) पक्षाच्या नगरसेवक संख्येनुसार या पक्षाकडून दोन स्वीकृत सदस्यांची शिफारस करण्यात आली. यापूर्वी स्वीकृत सदस्य म्हणून निवड झालेल्या ॲड. धर्मेंद्र भट्ट यांनी यावेळीही स्वीकृत सदस्यांसाठी अर्ज भरला. माजी नगरसेवक रवींद्र (बंड्या) म्हात्रे यांचा सार्वत्रिक निवडणुकीत पराभव झाला. त्यामुळे पक्षाने त्यांना संधी देत स्वीकृत सदस्य पदासाठी संधी दिली. शिवसेनेत प्रवेश घेतलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका दीपा पामाळे व युवासेनेचे अमेय पाटील यांनी देखील स्वीकृत नगरसेवक पदासाठी अर्ज केला होता. गट नेत्यांकडून देण्यात आलेल्या पत्रात ॲड. धर्मेंद्र भट्ट व रवींद्र म्हात्रे यांच्या नावांची शिफारस करण्यात आली होती. त्यामुळे सभेचे पीठासीन अधिकारी असणाऱ्या नगराध्यक्ष उत्तम घरत यांनी भट्ट आणि म्हात्रे यांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड झाल्याचे जाहीर केले. तसेच भाजपचे गटनेते भावानंद संखे यांनी जयेश आव्हाड यांच्या नावाची शिफारस केल्याने पिठासीन अधिकाऱ्यांनी आव्हाड यांची स्वीकृत सदस्य पदी निवड केली.

Comments
Add Comment