माणगाव : ताम्हिणी घाटात सणसवाडी बेडगाव हद्दीत सिक्रेट पॉइंटकडे जाणाऱ्या रस्त्याशेजारी अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला होता. सुरुवातीलाच पोलिसांनी घातपात असल्याचा संशय आल्याने पोलिसांनी त्या दृष्टीने तपास करत दोन आरोपींना माणगाव पोलिसांनी अटक केली. तालुक्यातील पुणे दिघी महामार्गावर असलेल्या ताम्हिणी घाटातील मौजे सणसवाडी गावच्या हद्दीतील सीक्रेट पॉईंटजवळ दि. ११ जानेवारी रोजी एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला. फिर्यादी हे जागा दाखविण्यासाठी गेले असता २५ ते ३० वर्षे, वयोगटातील पुरुष निपचिप अवस्थेत दिसून आला. तत्काळ त्यांनी माणगाव पोलिसांना संपर्क साधला असता माणगाव पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी मयत इसमाच्या अंगावर डाव्या बाजुच्या खांद्याच्या खाली, गळ्याला व डोक्याला जखमा दिसल्या. तसेच जमिनीवर सुखलेल्या रक्ताचे डाग दिसले. परंतु, सदर व्यक्तीची ओळख पटत नव्हती. मयत इसमाच्या अंगावरील खुणा पाहून घातपात असल्याचा संशय पोलिसांनी आला. त्यानुसार माणगाव पोलिसांनी शोध घेऊन पुणे येथून आरोपी अनिकेत वाघमारे आणि तुषार उर्फ सोन्या पाटोळे यांना २४ तासाच्या आत अटक केली. घटनेचा पुढील तपास माणगाव पोलीस करत आहेत.






