Tuesday, January 13, 2026

इराणमध्ये अस्थिरता कायम; आंदोलनातील मृतांचा आकडा पाचशे पार..

इराणमध्ये अस्थिरता कायम; आंदोलनातील मृतांचा आकडा पाचशे पार..

तेहरान : इराणमध्ये सुरू असलेली सरकारविरोधी आंदोलनं अद्यापही थांबलेली नसून, देशातील अनेक भागांमध्ये परिस्थिती तणावपूर्ण आहे. या आंदोलनांदरम्यान आतापर्यंत ५४४ नागरिकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज मानवाधिकार निरीक्षकांकडून व्यक्त करण्यात आला आहे. मृतांमध्ये काही अल्पवयीन मुलांचाही समावेश असल्याचं सांगितलं जात आहे.

आर्थिक परिस्थितीमुळे असंतोष

वाढती जीवनावश्यक वस्तूंची किंमत, रोजगाराच्या संधींचा अभाव आणि चलनमूल्य घसरण यामुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत होती. डिसेंबरच्या अखेरीस या असंतोषातून विविध ठिकाणी निषेध आंदोलनं सुरू झाली. सुरुवातीला मर्यादित स्वरूपात असलेली ही आंदोलनं नंतर अनेक शहरांमध्ये पसरली.

प्रशासनाची कारवाई

आंदोलनांदरम्यान काही ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर प्रशासनाकडून सुरक्षेची उपाययोजना कऱण्यात आली. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अटकसत्र आणि बंदोबस्त यांचा वापर करण्यात येत आहे.

सरकारची भूमिका

इराण सरकारने देशातील अस्थिरतेसाठी बाह्य हस्तक्षेप आणि हिंसक घटक जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. तसेच, आर्थिक प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आलं आहे.

राष्ट्रपतींचं आवाहन

राष्ट्रपती मसूद पेझेश्कियान यांनी नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. त्यांनी स्पष्ट केलं की, शांततापूर्ण मार्गाने आपली मतं मांडणं वेगळं असून हिंसाचाराला प्रोत्साहन देणं चुकीचं आहे. द

आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया

इराणमधील घडामोडींवर आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वांचाच लक्ष आहे. धार्मिक व राजकीय नेत्यांनी संयम आणि संवादाचा मार्ग स्वीकारण्याचं आवाहन केलं आहे. दरम्यान, अमेरिकेसह काही देशांनी नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली आहे.

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी परदेशी नेत्यांच्या वक्तव्यांवर प्रतिक्रिया देत, इराणच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप न करण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी परकीय नेतृत्वाने स्वतःच्या देशातील प्रश्नांकडे लक्ष द्यावं, असंही म्हटलं आहे.

Comments
Add Comment