८ महिन्यांत ६० रुग्णांना मिळाली मदत
अलिबाग:रायगड जिल्ह्यातील गरीब, गरजू रुग्णांसाठी जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष एक मोठा आधारवड ठरला आहे. १ मे २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या अवघ्या आठ महिन्यांच्या कालावधीत या कक्षाद्वारे ४७ लाख २० हजार रुपयांची आर्थिक मदत रुग्णांना वितरित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने जाहीर केलेल्या अहवालातून ही सकारात्मक माहिती समोर आली आहे. जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यलयात हा कक्ष सुरू करण्यात आला आहे. वैद्यकीय उपचारासाठी मदत मिळावी, यासाठी गरजू रुग्ण व त्यांचे नातेवाईक मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडे मोठ्या प्रमाणात अर्ज करीत असतात. अर्जाचा पाठपुरावा करण्यासाठी त्यांना मंत्रालयात वारंवार खेटे मारावे लागतात. यात रुग्ण व नातेवाइकांची होणारी परवड थांबविण्याच्या उद्देशातून अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात हा कक्ष स्थापन करण्यात आला आहे. महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना आणि धर्मादाय रुग्णालय योजनेच्या माध्यमातूनही अनेक रुग्णांना उपचारांचा लाभ मिळवून देण्यात आला आहे. केवळ आर्थिक मदतच नव्हे, तर प्रत्यक्ष जमिनीवर उतरून आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाने मोठी कामगिरी केली आहे.
नमो नेत्र संजीवनी अभियान अंतर्गत १९९ शिबिरांद्वारे ५ हजार ९९६ रुग्णांची तपासणी करण्यात आली. श्री गणेशा आरोग्याचा अभियानातून १५३ शिबिरांच्या माध्यमातून ७ हजार ३४१ लाभार्थीची तपासणी झाली, तसेच रक्तदान अभियानातून आयोजित ५ रक्तदान शिबिरांतून २१२ पिशव्या रक्त संकलित करण्यात आले. दरम्यान, आरोग्य सेवेसोबतच नैसर्गिक आपत्तीमध्येही या कक्षाने योगदान दिले आहे. पूरग्रस्तांसाठी ८ लाख ९० हजार रुपयांच्या देणग्या जमा करून मदत पोहोचविण्यात आली, तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या प्रचारासाठी राबविलेल्या २२ उपक्रमांमध्ये ५ हजार ७७८ नागरिकांनी सहभाग नोंदवला, ज्यामुळे योजनेची माहिती तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. जिल्हाधिकारी कार्यालयाशी सध्या ३८ रुग्णालये संलग्न असून, १५ रुग्णालयांना प्रत्यक्ष भेटी देऊन तेथील सोयीसुविधांची पाहणी करण्यात आली आहे. प्रशासनाच्या या तत्परतेमुळे रायगडमधील सामान्य जनतेला आरोग्य सुविधा मिळवणे सुलभ झाले.






