मुंबई : महाराष्ट्रात कोणी गुंतवणूकदार आला की, त्याला मारा, त्याच्या विरोधात आंदोलन करा. संस्कृती रक्षक तर आम्ही पण आहोत. पण आमच्या मराठी मुलांना, महाराष्ट्रातील मुलांना, मुंबईकरांना हाताला रोजगार मिळाला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. मात्र राज ठाकरे हे उद्योजक विरोधी, गुंतवणूक विरोधी, युवक विरोधी आणि युवकांच्या रोजगार मिळण्याच्या कामाविरोधी आहेत, मुंबईकर तुम्हाला तुमची जागा दाखवतील.", अशी टीका मंत्री आशिष शेलार यांनी केली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेला मंत्री शेलार यांनी संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले.
यावेळी ते म्हणाले की, कधी-कधी सल्लागार कुणाची कशी वाट लावू शकतात, हे आपल्याला बरेचदा वेगवेगळी उदाहरणे दिसतात. राज ठाकरेंनी सुद्धा सल्लागारापासून सावधान राहावं. सल्लागाराने सांगितलं, एखादी ब्रीफ दिली आणि त्या आधारावर बोललं, की कशी अडचण निर्माण होते हे राज ठाकरेंच्या विधानावरून लक्षात येते. म्हणून त्यांना आता स्पष्टीकरण द्यायला लागलंय.
आम्ही कुठल्याही उद्योग समूहाचे समर्थक नाही. जे नियमानुसार, कायद्यानुसार गुंतवणूकदार आणि उद्योजक आले पाहिजेत, ही कामं होत असतात, त्या कामाच्या बाबतीमध्ये संपूर्ण गुंतवणूकदारांचा आलेख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभेत मांडला आहे.
राज ठाकरेंचा आक्षेप काय? तर दहा वर्षात, अदानींची वाढ झाली. मी अदानी समूहाचा वकील नाही पण अदानी समूहाच्या नावावर भारतीय जनता पक्ष किंवा आमच्या सरकारवर दोषारोप करणार असाल, तर उत्तर द्यावं लागेल. आणि ते राज ठाकरेंच्या सल्लागारांनी त्यांना सांगितलं नाही की अदानी समूहाची सुरुवात १९८८ सालची आहे. दहा वर्षांपूर्वीची नाही.
आणि मग तिथपासून मोजायचे झाले तर ३६-३७ वर्षे. आम्हाला त्यांची वकिली करायची गरज नाही पण आकडा सत्य सांगायला लागेल. ३७ वर्षे ते काम करतायत, मग दहा वर्षे आणली कुठून? ही सल्लागाराची चूक. बरं तेवढंच नाही, वाढ का झाली कशी झाली, तो वेठीस धरू नये मुद्दा बरोबर, पण जागा चुकीची.
यासाठी की आपल्या देशामध्ये कॉम्पिटिशन कमिशन आहे. 'भारतीय स्पर्धा आयोग' आहे. त्या स्पर्धा आयोगाचे कामच हे आहे की ज्यामध्ये या स्पर्धा, व्यावसायिक ज्यामध्ये वेगवेगळे समूह असतात त्याबद्दल मोनोपॉली (एकाधिकारशाही) होऊ नये. म्हणून तिकडे तक्रार करता येते. राज ठाकरेंनी तक्रार केली आहे का? त्यांनी तक्रार करावी, तिथे आपलं म्हणणं मांडावं.अहो न्यायालयासमोर जामीन अर्ज केल्यावरच जामीन मिळतो. जामीन माझा अधिकार आहे म्हणून घरात किंवा लपून बसल्यावर जामीन मिळत नाही, असा जो कायदा आहे... तसंच वेठीस धरू नका मुद्दा बरोबर वाटत असेल तर आयोग आहे, कॉम्पिटिशन कमिशन आहे, पण केलं नाही कारण सल्लागाराने सांगितलं नाही, असा टोला एँड शेलार यांनी लगावला.
ते पुढे म्हणाले की, जे जे समूह अदानींनी घेतले असं तुम्ही म्हणताय आणि त्यावरून आमच्यावर दोषारोप करताय त्यातले कित्येक प्रोजेक्ट्स NCLT मधून आलेत. मग NCLT नावाची व्यवस्था आहे, ती अर्ध-न्यायिक, न्यायिक व्यवस्था आहे. मग त्या न्यायिक व्यवस्थेतून दिलेल्या आदेशावरून सरकारवर आणि पक्षावर दोषारोप करावा असा बेबनावपणा कशाला करायचा? NCLT किंवा त्याच्या अपिलेटवर जावं आणि म्हणून आपलं म्हणणं खोटं बोल पण रेटून बोल हा राज ठाकरेंचा प्रयत्न आहे, सल्लागाराने त्यांना तोंडघशी पाडलंय.
आमचा आरोपच आहे, दोन्ही ठाकरे हे गुंतवणूक विरोधी आहेत, गुंतवणूकदार विरोधी आहेत, उद्योजक विरोधी आहेत आणि पर्यायाने आणि बरोबरीने रोजगार निर्मितीच्या विरोधात दोन्ही ठाकरे आहेत. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन: जपानच्या सरकारकडून बिनव्याजी कर्ज. त्यावर हा प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावर ९० हजार थेट व अप्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण होणार. पण यांचा.बुलेट ट्रेनला विरोध. म्हणजे ९० हजार बेरोजगारांना रोजगार द्यायला विरोध. नाणार-बारसू रिफायनरी प्रकल्प: हा प्रकल्प महाराष्ट्रात येणार, दोन्ही ठाकरेंचा विरोध. प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष १.५ लाख रोजगार निर्मिती. किती? १.५ लाख लोकांना. दोन्ही ठाकरेंचा विरोध.
जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प: २५ हजार प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती. या गुंतवणुकीला कडाडून विरोध दोन्ही ठाकरेंनी केला. रोजगार निर्मितीला विरोध.
मुंबई मेट्रो प्रकल्प: त्याला उद्धव ठाकरेंनी तर स्थगितीच दिली होती. ३ लाख प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष नोकऱ्यांची निर्मिती. या प्रकल्पाला, गुंतवणुकीला विरोध कोणाचा? या दोन्ही ठाकरेंचा.
वाढवण बंदर: या बंदरातून सुद्धा १० लाख रोजगाराची निर्मिती. यांचा विरोध.
आणि म्हणून, जे आपल्यावर बेरोजगारी लादू इच्छितात, गुंतवणूकदार विरोधी असतात, महाराष्ट्राच्या प्रगतीला खीळ घालू पाहतात आणि एका हाताने महाराष्ट्राच्या विकासाला विरोध करतात, त्या दोन्ही ठाकरे बंधूंना घरी बसवण्याची ही निवडणूक आहे. त्यांना घरी बसवण्याची निवडणूक आहे, असा शब्दात टीका केली.






