Wednesday, January 14, 2026

टाकाऊ कपड्यांतून साकारली कलाकृती; पंतप्रधान मोदीचं ६ फूट पोर्ट्रेट चर्चेत

टाकाऊ कपड्यांतून साकारली कलाकृती; पंतप्रधान  मोदीचं ६ फूट पोर्ट्रेट चर्चेत
ब्रह्मपूर (ओडिशा):येथील तरुण फॅशन डिझायनर्सनी आपल्या कल्पकतेतून आणि परिश्रमातून एक अनोखी कलाकृती साकारत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भव्य पोर्ट्रेट तयार केले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हे पोर्ट्रेट जुन्या व टाकाऊ कपड्यांपासून पूर्णपणे हाताने शिवून बनवण्यात आले आहे. सुमारे १५ दिवसांच्या अथक परिश्रमानंतर तयार झालेले हे पोर्ट्रेट ६ फूट उंच आणि ५ फूट रुंद आहे. ब्रह्मपूर येथील जेडी इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या कलाकृतीला “फॅब्रिक ऑफ रिस्पेक्ट” असे नाव देण्यात आले आहे. शहरातील विविध भागांमधून गोळा करण्यात आलेल्या कपड्यांचे लहान-लहान तुकडे एकत्र करून हे पोर्ट्रेट साकारण्यात आले. ब्रह्मपूरचे आमदार के. अनिल कुमार यांच्या उपस्थितीत या पोर्ट्रेटचे औपचारिक अनावरण करण्यात आले. यावेळी त्यांनी पुनर्वापर केलेल्या कपड्यांपासून पंतप्रधानांचे पोर्ट्रेट तयार करण्याचा हा देशातील पहिलाच प्रयोग असल्याचे सांगितले. इन्स्टिट्यूटचे संचालक आशिष रंजन सबत यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे पोर्ट्रेट तयार करण्यासाठी तीन स्वतंत्र टीम तयार करण्यात आल्या. पहिल्या टीमने शहरातील शिवणकाम केंद्रांमधून जुने कपडे गोळा केले. दुसऱ्या टीमने ते कापड कापून, वर्गीकरण करून इस्त्री केली. त्यानंतर तिसऱ्या टीमने कपड्यांचे तुकडे पूर्णपणे हाताने शिवून प्रतिमेत बसवले. या प्रक्रियेत गोंद किंवा रंगांचा कोणताही वापर करण्यात आलेला नाही. विद्यार्थ्यांनी दिवसाला ८ ते १० तास काम करत कपड्यांचे छोटे पिक्सेलसारखे तुकडे करून पंतप्रधानांच्या प्रतिमेची अचूक रचना उभी केली. साध्या कापडांपासून ते पारंपरिक संबलपुरी वस्त्रांपर्यंत विविध प्रकारच्या कापडांचा वापर या पोर्ट्रेटमध्ये करण्यात आला आहे.
Comments
Add Comment