पुढील तीन दिवसांमध्ये राखली जाणार स्वच्छता मोहिम
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्या आदेशानुसार, गुरुवार दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी मतदान होणार आहे. या निमित्ताने, मुंबई महानगरातील सर्व मतदान केंद्रांवर तसेच मतमोजणी केंद्रांवर उत्तम प्रकारची स्वच्छता राहावी, यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात येत आहे. १४ ते १६ जानेवारी २०२६ रोजी राबविल्या जाणाऱ्या या मोहिमेच्या माध्यमातून मतदान केंद्र, मतमोजणी केंद्र तसेच आसपासचा परिसर स्वच्छ ठेवावा, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी दिले आहेत.
मुंबईतील सार्वजनिक ठिकाणांवर उत्तम प्रकारची स्वच्छता ठेवण्यासाठी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनात तसेच उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांच्या देखरेखीत विविध उपाययोजना केल्या जातात. तसेच, विविध उपक्रमांचेही आयोजन केले जाते.
याच पार्श्वभूमीवर, मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या अनुषंगाने, मतदानाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच १४ जानेवारी २०२६ रोजी, प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी म्हणजेच १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान केंद्रांवर तसेच १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी केंद्र आणि परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. मतदानासाठी निश्चित केलेल्या सर्व १० हजार २३१ मतदान केंद्रांवर तसेच २३ मतमोजणी केंद्रांवर या मोहीम अंतर्गत स्वच्छता करण्यात येईल.
दरम्यान, घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने विविध मतदान केंद्रांच्या ठिकाणी सुमारे ४ हजार शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान केंद्रावर येणाऱ्या मतदारांना अत्यंत सुलभतेने मतदान करता यावे. तसेच त्यांना आवश्यक त्या सोयी-सुविधा मिळाव्यात यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान करुन लोकशाही बळकट करण्यात योगदान द्यावे, असे आवाहन डॉ. अश्विनी जोशी यांनी महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने केले आहे.
मतदानाच्या पूर्णतयारीची पाहणी करण्यासाठी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी एन विभागातील मध्यवर्ती निवडणूक केंद्र कार्यालय तसेच शिवाजी टेक्निकल इन्स्टिट्यूट येथील मतदान केंद्रास आज भेट दिली. मतदारांना मतदानाच्या दिवशी आवश्यक असलेल्या सोयी-सुविधा प्रभावीपणे उपलब्ध करून देण्याबाबत याव्यात. विशेषतः दिव्यांग मतदारांना आवश्यक त्या सुविधा तत्काळ उपलब्ध करून देण्यात याव्यात. तसेच फिरत्या प्रसाधनगृहांची (मोबाईल टॉयलेट) नियमित स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था याबाबत तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी दिले.