वार्तापत्र : दक्षिण महाराष्ट्र
कोल्हापूर महापालिकेची स्थापना झाल्यापासून गटातटाचे सुरू असलेले राजकारण गेल्या तीन निवडणुकांमध्ये संपून पक्षीय राजकारणाला सुरुवात झाली. यावेळी शिवसेना व राष्ट्रवादीतील फुटीनंतर महायुतीमध्ये गेलेल्या दोन नवीन पक्षांमुळे युती विरुद्ध महाविकास आघाडी अशी विभागणी झाली. राज्य, केंद्रातील सत्तेमुळे जिल्ह्यात महायुतीचे पारडे जड असून, महाविकास आघाडीला प्रचंड झगडावे लागणार आहे. महानगरपालिकांमध्ये काही ठिकाणी स्थानिक आघाड्यांमधून राजकारण केले जाईल असे दिसते. महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांचा उत्साह शिगेला पोहोचला असून, पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, इचलकरंजी आणि सांगली महापालिकांच्या निवडणुका १५ जानेवारी २०२६ रोजी होणार आहेत. कडवी स्पर्धा आहे. या निवडणुका पश्चिम महाराष्ट्रातील सत्ता समीकरणे ठरवतील, ज्यात विकास, पाणी, रस्ते आणि रोजगार हे मुद्दे केंद्रस्थानी आहेत. कोल्हापूर महापालिकेत ८१ जागांसाठी ३२७ उमेदवार रिंगणात आहेत. महायुतीने 'जे मनात तेच मनपात' या टॅगलाइनसह कर्तव्यनामा प्रसिद्ध केला, ज्यात शहर विकासावर भर आहे. उच्च- शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ९ जानेवारीला सिंधी समाजाशी संवाद साधत महायुतीला पाठिंबा मागितला. मात्र, महाविकास आघाडीने 'कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्सं' जाहीरनामा काढून शहर सीमा विस्तारावर मतभेद दाखवले. शिवसेना (उद्धव) आणि काँग्रेसमध्ये या मुद्द्यावर फूट पडली आहे. राष्ट्रवादी (शरद), आम आदमी पार्टी आणि वंचित बहुजन आघाडीची 'राजर्षी शाहू आघाडी' सक्रिय आहे. या आघाडीच्या उमेदवारांनी 'भ्रष्टाचार करणार नाही, पक्ष सोडणार नाही' असे स्टॅम्पवर शपथपत्र दिले. जनसुराज्य शक्ती पक्षही मैदानात असून, विनय कोरे यांच्या प्रचार सभा ९ आणि १० जानेवारीला झाल्या. येथे आमदार सतेज पाटील, हसन मुश्रीफ आणि धनंजय महाडिक यांचे राजकीय अस्तित्व पणाला लागले आहे. महाविकास आघाडीची फूट महायुतीला फायदा देऊ शकते; परंतु अंतर्गत कलहामुळे महायुतीचे भवितव्य अनिश्चित आहे.
सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेत ७८ जागांसाठी ३८१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. काही प्रभागांमध्ये ही लढत बहुरंगी, तर काही ठिकाणी तिरंगी व चौरंगी स्वरूपाची आहे. त्यामुळे प्रचारात कमालीची रंगत निर्माण झाली. ‘हाय व्होल्टेज’ ठरणाऱ्या प्रभागांमध्ये तणाव आहे. आरोप-प्रत्यारोप, विकासकामांचे दावे आणि राजकीय समीकरणांची जोरदार चर्चा सुरू आहे. महायुतीत भाजप आणि शिवसेना (शिंदे) यांच्यात १९ प्रभागांत थेट संघर्ष आहे, ज्यात उमेदवार परस्परविरोधी प्रचार करत आहेत. राष्ट्रवादी (अजित) चे तर थेट काँग्रेस-राष्ट्रवादीशी मिळते -जुळते घेत ३३ उमेदवार उभे करून भाजपला आव्हान दिले आहे. अजित पवार यांची ९ जानेवारीला सभा झाली, ज्यात त्यांनी विकासाचे आश्वासन दिले. महाविकास आघाडी एकत्र लढत असून, आमदार विश्वजित कदम आणि जयंत पाटील यांनी ८ जानेवारीला प्रभाग १६, १५, १० आणि १९ मध्ये प्रचार यात्रा काढल्या. ज्याला मिळालेल्या प्रतिसादानंतर भाजपने तीन माजी नगरसेवकांसह ९ जणांना निलंबित केले. इथे २७ वर्षांत ही सहावी निवडणूक असली तरी समस्या जैसे थे आहेत. येथे विश्वजित कदम, जयंत पाटील आणि संजय काका पाटील, विशाल पाटील यांचे भवितव्य ठरणार आहे. महायुतीच्या अंतर्गत फुटीमुळे महाविकास आघाडीला फायदा होऊ शकतो.
इचलकरंजी महापालिकेत ६५ जागांसाठी २३० उमेदवार आहेत. निवडणुकीमुळे वस्त्रनगरीमध्ये कोट्यवधींची उलाढाल होत आहे. ज्यामुळे कामगार वर्गाच्या हाती रोकड खेळत आहे. कारण उमदेवारीतील वादाने राजकारण बेभरवशाचे झाले आहे. सतेज पाटील यांनी ८ जानेवारीला प्रचार सभेत भाजपला टोला लगावला, 'मूळ भाजपवाले कोठे आहेत?' म्हणत पाणी प्रश्नावर आव्हान दिले. महायुती मजबूत दिसत असली तरी शिव-शाहू आघाडी नवख्या उमेदवारांसह टक्कर देत आहे. येथे प्रकाश आवाडे आणि चंद्रकांत पाटील यांचे नेतृत्व महत्त्वाचे आहे. या निवडणुकांमध्ये महायुतीचे भवितव्य अंतर्गत एकजुटीवर अवलंबून आहे, तर महाविकास आघाडीची फूट आणि बंडखोरी फटका देऊ शकते. नेत्यांमध्ये सतेज पाटील, जयंत पाटील, विश्वजित कदम, हसन मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील यांचे राजकीय भवितव्य ठरणार आहे. मतदारांना विकास मुद्दे प्रभावित करतील का आणि मतदान जनजागृती मोहिमा (जसे कोल्हापूरची 'मतदान दौड') मुळे मत टक्का वाढीचे प्रमाण वाढेल का हा प्रश्न आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांचा दक्षिण महाराष्ट्रातील प्रभाव कितपत पडला आहे याचे उत्तर कोल्हापूर, सांगली आणि इचलकरंजी महापालिकेच्या निकालातून मिळणार आहे. त्यामुळे भाजप पदाधिकाऱ्यांना मतभेद विसरून एकत्र लढ्यास सिद्ध करण्याची आणि तो यशस्वी करण्याची जबाबदारी पाटील त्यांच्यावर येऊन पडलेली आहे. यातून ते यश कसे खेचून आणतील याकडे दक्षिण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. महापालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत मतदान होणार आहे. मतदान समाप्तीच्या ४८ तास आधी जाहीर प्रचार बंद होणार. त्यामुळे जाहीर प्रचारास आता अवघे दोन दिवस उरलेत. त्यामुळे उर्वरित वेळेत मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वच पक्ष आणि उमेदवार धडपडताना दिसत आहेत. कोणत्या प्रभागात कोण बाजी मारणार, सत्ता कोणाच्या हाती जाणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.






