Tuesday, January 13, 2026

शिखर धवनच्या आयुष्यात नवी इनिंग! सोफी शाइनसोबत उरकला साखरपुडा

शिखर धवनच्या आयुष्यात नवी इनिंग! सोफी शाइनसोबत उरकला साखरपुडा

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर शिखर धवनने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा गाठत दीर्घकाळापासूनची मैत्रिण सोफी शाइनसोबत साखरपुडा केला आहे. सोमवारी (१२ जानेवारी) धवनने अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर खास पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली.

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये धवनने आयुष्यभर एकत्र राहण्याच्या निर्णयाबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत. “एकत्र हसणं, एकत्र स्वप्न पाहणं आणि एकमेकांचा हात धरून पुढे जाणं… या सगळ्या प्रवासासाठी मिळालेल्या प्रेम आणि शुभेच्छांबद्दल मनापासून आभारी आहे,” असे भावनिक शब्द त्याने पोस्टमध्ये नमूद केले आहेत.

दुबईत सुरू झालेली ओळख, प्रेमात रूपांतर

शिखर धवन आणि सोफी शाइन यांची ओळख काही वर्षांपूर्वी दुबईमध्ये झाली होती. सुरुवातीला मैत्रीच्या नात्याने सुरू झालेला हा प्रवास कालांतराने प्रेमात बदलला. मे २०२५ मध्ये दोघांनी आपले नाते अधिकृतपणे सार्वजनिक केले होते. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान दोघे एकत्र दिसल्यानंतर त्यांच्या नात्याची चर्चा रंगली होती.

 
View this post on Instagram
 

A post shared by Shikhar Dhawan (@shikhardofficial)

शिक्षण, करिअर आणि सामाजिक कार्यात सक्रिय सोफी

आयरलंडची नागरिक असलेली सोफी शाइन ही उच्चशिक्षित असून तिने लिमरिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून मार्केटिंग आणि मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले आहे. सध्या ती अबूधाबी येथे एका आंतरराष्ट्रीय संस्थेत वरिष्ठ पदावर कार्यरत आहे. व्यावसायिक आयुष्यासोबतच ती सामाजिक उपक्रमांमध्येही सक्रिय असून शिखर धवन फाउंडेशनच्या कार्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या फाउंडेशनच्या माध्यमातून क्रीडा आणि समाजसेवेसंबंधी विविध उपक्रम राबवले जातात.

दुसरं लग्न

या साखरपुड्यानंतर शिखर धवन लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचे संकेत मिळत आहेत. हा त्याचा दुसरा विवाह असणार आहे. यापूर्वी त्याचा विवाह आयेशा मुखर्जी यांच्याशी झाला होता. २०२३ मध्ये दोघांचा कायदेशीर घटस्फोट झाला. धवनला त्या विवाहातून झोरावर नावाचा मुलगा आहे.

Comments
Add Comment