कर्नाटक : मासिक पाळीशी संबंधित वेदना अनेकदा हलक्याने घेतल्या जातात. मात्र अशा वेदना एखाद्या व्यक्तीसाठी प्रचंड मानसिक आणि शारीरिक त्रासाचं कारण ठरू शकतात, हे कर्नाटकातील एका हृदयद्रावक घटनेतून समोर आलं आहे. अवघ्या १९ वर्षांच्या एका तरुणीचा मृत्यू हा केवळ वैयक्तिक दुर्दैव नसून, स्त्रियांच्या आरोग्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा प्रकार ठरला आहे.
वेदनांशी झुंज
कर्नाटकातील तुमकुरु जिल्ह्यातील उरडीगेरे परिसरातील ब्याठा गावात ही घटना घडली. मूळची कलबुर्गी जिल्ह्यातील रहिवासी असलेली कीर्तना काही महिन्यांपूर्वी कामानिमित्त आपल्या नातेवाइकांकडे आली होती. काम मिळेपर्यंत ती त्यांच्याच घरी वास्तव्यास होती.
दीर्घकाळ चाललेला शारीरिक त्रास
मिळालेल्या माहितीनुसार, कीर्तना बराच काळ पोटात होणाऱ्या तीव्र वेदना आणि मासिक पाळीच्या त्रासामुळे त्रस्त होती. अनेकदा हा त्रास इतका वाढायचा की तिला दैनंदिन कामकाज करणंही कठीण व्हायचं. घटनेच्या दिवशी घरात कोणीही नसताना, ती असह्य वेदना आणि मानसिक तणाव सहन करू शकली नाही. आणि त्यातच तोच मृत्यू झाला.
पोलीस कारवाई आणि तपास
घटनेची माहिती मिळताच क्याथासंद्रा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, नैसर्गिक मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. प्रकरणाच्या सर्व बाजूंनी तपास सुरू असून, नेमकी परिस्थिती स्पष्ट करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात आहे.
ही घटना महिलांच्या आरोग्यविषयक प्रश्नांकडे पाहण्याच्या आपल्या दृष्टिकोनावर गंभीर विचार करायला भाग पाडणारी आहे. मासिक पाळीशी निगडित वेदना किंवा दीर्घकाळ टिकणाऱ्या शारीरिक समस्या यांना “सामान्य” म्हणून दुर्लक्षित करणं किती धोकादायक ठरू शकतं, याचं हे विदारक उदाहरण आहे.






