दुबार मतदान करणार नसल्याचे पाच हजार मतदारांकडून हमीपत्र
विरार :वसई - विरार महापालिका क्षेत्रात असलेल्या ५२ हजार दुबार मतदारांपैकी तब्बल २९ हजार १२७ मतदारांच्या रहिवासाचा पत्ता महापालिकेच्या पथकांना सापडला नाही. तर २३ हजार २५२ मतदारांचा शोध घेण्यात आला आहे. ५ हजार १५८ मतदारांकडून दुबार मतदान करण्यात येणार नाही अशा बाबतचे हमीपत्र लिहून घेण्यात आले आहे. उर्वरित मतदारांकडून मतदानाच्या दिवशीच हमीपत्र लिहून घेण्यात येणार असल्याचे पालिकेने सांगितले आहे. दुबार मतदारांबाबत संपूर्ण राज्यात आरोप प्रत्यारोप होत आहेत. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने सुद्धा या बाबीला गंभीरतेने घेतले आहे. मतदार यादीमध्ये दुबार नाव असलेल्या प्रत्येक मतदारांच्या नावासमोर दोन स्टार देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे दुबार मतदारांचा शोध घेऊन, कोणत्याही एकाच मतदान केंद्रावर मतदान करणार अशा प्रकारचे हमी पत्र लिहून घेण्यात येत आहे.
त्याचप्रमाणे आता अशा प्रकारचे हमीपत्र दुबार नावे असलेल्या मतदारांकडून लिहून घेण्यात आले नसल्यास, मतदानाच्या दिवशी सुद्धा ही प्रक्रिया राबविली जाणार आहे. वसई - विरार महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया येत्या १५ जानेवारी रोजी होत आहे. प्रभाग रचना, आरक्षण सोडत झाल्यानंतर मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. १ जुलै २०२५ पर्यंतच्या गृहीत धरलेल्या विधानसभा मतदार यादीनुसार पालिका हद्दीत ११ लाख २६ हजार ४०० मतदारांची नोंद आहे. यामध्ये ५२ हजार ३७९ मतदारांची नावे ही दुबार असल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून मिळाली होती. त्यानंतर पालिकेने दुबार असलेल्या मतदारांकडून मतदान कुठे करणार? याबाबतचे हमीपत्र लिहून घेण्याची प्रक्रिया सुरू केली होती.
दुबार मतदारांपैकी पालिकेला २३ हजार २५२ मतदारांचा पत्ता शोधण्यात यश आले. मात्र त्यापैकी केवळ ५ हजार १५८ मतदारांपर्यंत पोहोचून त्यांच्याकडून हमीपत्र लिहून घेण्यात आले आहे. मात्र या सर्व दुबार मतदारांकडून मतदानाच्या दिवशी हमीपत्र लिहून घेण्यात येणार आहे. संबंधित केंद्रावर मतदान करण्यास आलेल्या दुबार मतदारांकडून त्याचवेळी मतदान केल्यानंतर हमीपत्र लिहून घेण्यात असल्याचे पालिकेने सांगितले.






