मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांची ग्वाही
वसई :मच्छीमार बांधवांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आम्ही सदैव प्रयत्नात आहोत. केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून आता नवीन २६ योजना मच्छीमार बांधवांच्या हितासाठी राबविण्यात येतील अशी ग्वाही राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली. वसई विरार महापालिकेच्या निवडणुकीसाठी सोमवारी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ वसई येथे पार पडलेल्या सभेत मंत्री राणे यांनी सांगितले की, मी राणे आहे. दिलेला शब्द पाळणे असे आमच्यावर राणे साहेबांचे संस्कार आहेत. आमचा शब्द म्हणजे बंदुकीतील गोळीसारखा आहे. त्यामुळे जे बोलतो ते आम्ही करतो. मच्छीमार बांधवांसाठी दोन लाखांचे बिनव्याजी कर्ज मिळणार आहे. सर्व मच्छीमारांना याचा लाभ मिळणार आहे. तसेच मच्छीमारांसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून २६ नवीन योजना आणणार आहोत, असे त्यांनी यावेळी सांगितले. वाढवण बंदरामुळे मच्छीमारी बंद होईल अशी अफवा ज्यांना मच्छीमारी व्यवसायातील पाच टक्के ही कळत नाही ते लोक पसरवीत आहेत. मात्र, तुम्ही काहीही काळजी करू नका, असे त्यांनी सांगितले. तर दिवाणमान येथे झालेल्या सभेत, आय लव महादेव विचाराचे नगरसेवक, महापौर तुम्ही बसवावेत हे सांगण्यासाठी मी इथे आलोय, असे मंत्री राणे म्हणाले. तुम्ही फक्त आशीर्वाद द्या. १६ तारखेनंतर या परिसराचा कायापालट करण्याची जबाबदारी आमची आहे. आम्हाला इथे हिंदू-मुसलमान करायचे नाही पण तुम्ही हिंदूबरोबर मस्ती करणार असाल तर आम्ही ही दोन हाथ करायला तयार आहोत. शेवटी आम्ही बाळासाहेबांचे ओरिजनल सैनिक आहोत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.






