नांदगाव मुरुड : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याच्या शक्यतेवर आरक्षणाच्या मुद्द्यामुळे त्या लांबणीवर पडणार असल्याच्या वृत्तामुळे जिल्हा परिषद व तालुका पंचायत समितीसाठी बाशिंग बांधून तयार असलेल्या मुरुड तालुक्यातील विविध पक्षांच्या इच्छुकांचा मात्र हिरमोड झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्य संस्थांच्या ३१ जानेवारी २०२६ पर्यंत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते.मात्र त्याची अंमलबजावणी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीकरिता राज्य निवडणूक आयोगाकडून होताना दिसत नाही. त्यातच पुढच्याच महिन्यात बारावी बोर्ड त्यानंतर दहावी बोर्डाच्या परीक्षा होणार आहेत. यामुळे या निवडणुका या महिन्यात होणार की नाही हा प्रश्न सर्व राजकीय पक्षांना पडला असून त्या सर्वांचे लक्ष सध्या राज्य निवडणूकीच्या हलचालीकडे व त्यांच्या होणाऱ्या पत्रकार परिषदेकडे लागले आहे.
तालुक्यातील २ जिल्हा परिषद गट तर ४ पंचायत समिती गणाच्या सार्वत्रिक निवडणुका होणार असून याकरिता जिल्हा परिषद उमेदवार व पंचायत समिती उमेदवारांची नावे ही त्या त्या पक्षांकडून जवळपास निश्चित झाल्याचे कळते.कारण या पक्षांच्या प्रत्येक उमेदवार व त्याच्या पक्षांकडून गावा गावात धार्मिक, सामाजिक शैक्षणिक कार्यक्रम घेतले जात आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व शिवसेना उबाठा गट यांना मोठे यश मिळून नगराध्यक्षपदासह प्रत्येकी चार-चार नगरसेवक निवडून आले होते. शिवसेना शिंदे गटाचे ११ तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा एक नगरसेवक निवडून आला होता. अशीच आघाडी अथवा महायुतीचा फॉर्म्युला अगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत असणार की अजुन काही नवीन समीकरणे जुळणार हे पाहणे मोठे औत्सुक्याचे ठरणार आहे. मात्र संभाव्य उमेदवार निवडणुका लवकर जाहीर व्हाव्यात यासाठी देव पाण्यात ठेवून वाट पाहत आहेत.






