हवा उत्तर मुंबईची
रवींद्र राऊळ : संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, पॅगोडा, मालाडचा समुद्रकिनारा अशी पर्यटन स्थळे असलेला उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ म्हणजे गगनचुंबी इमारती, मध्यमवर्गीयांच्या चाळी आणि झोपडपट्ट्यांचा संमिश्र परिसर. आजवर अनेक नागरी समस्यांनी वेढलेली ही उत्तर मुंबई आता उत्तम मुंबई होईल, हा भाजपचे खासदार आणि वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी दिलेला विश्वास या लोकसभा मतदारसंघातील एकूण ४० महापालिका प्रभागांमध्ये महायुतीचे किती उमेदवार निवडून आणू शकेल, याकडे तमाम नागरिकांचे लक्ष खिळून आहे.
माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी हा मतदारसंघ उत्तमपणे बांधला असतानाही मागील लोकसभा निवडणुकीत त्यांच्याऐवजी पीयूष गोयल यांना पक्षाने उमेदवारी दिली आणि ते निवडून आले. ते बाहेरील उमेदवार असले तरी त्यांनी इथेच आपले घर थाटले आणि केंद्रीय मंत्रीपदाची महत्त्वाची जबाबदारी असतानाही ते मतदारसंघात कायम जनसंपर्क ठेवून आहेत. किंबहुना मुंबईतील अन्य खासदारांपेक्षा सर्वात जास्त नागरी कार्यक्रम घेण्याचा उच्चांक त्यांनी प्रस्थापित केला आहे. आपण बाहेरून आलो ही भावना नागरिकांमध्ये निर्माण होणार नाही याची दक्षता ते घेत असावेत. उत्तर मुंबईचे उत्तम मुंबईत रूपांतर करण्याची ग्वाही वारंवार देत ते महापालिका, म्हाडा, एमएमआरडीए, उपनगर जिल्हाधिकारी, एसआरए, वनविभाग, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान अशा सर्व यंत्रणांच्या प्रमुखांच्या सातत्याने बैठका घेत स्वत: साऱ्या प्रकल्पांचा आढावा घेतात. यातून अनेकदा ते इतरांना करण्यासाठी काही कामे शिल्लक ठेवणार आहेत की नाही, अशीही टिप्पणी केली जाते. मात्र यातून त्यांनी मतदारसंघावर आपला ठसा निर्माण केला आहे आणि परिणामी मागील विधानसभा निवडणुकीत भाजपच्या चारही आमदारांना पुन्हा भरघोस मतांनी निवडून आणले. मागाठाणे मतदारसंघही मागीलप्रमाणे शिवसेना, तर मालाड कॉँग्रेसकडे राहिला. मात्र आता महायुतीतील भाजप आणि शिंदे सेना यांच्यातील वर्चस्वाची लढाई आणि उबाठा शिवसेना आणि मनसेची युती यामुळे निकालात नेमके कोणते चित्र असेल याबद्दल सर्वांना कमालीचे औत्सुक्य आहे. कॉँग्रेसची पकड असलेला मालाड आणि शिवसेनेचा गड मानला जाणारा मागाठाणे विधानसभा मतदारसंघ वगळले, तर दहिसर, बोरिवली, चारकोप आणि कांदिवली हे चारही विधानसभा मतदारसंघ म्हणजे भाजपचे बालेकिल्ले. भाजपसह मागील सर्व तेच आमदार इथे पुन्हा निवडून आले आहेत. यावरून भाजपची पकड लक्षात यावी. मालाड वगळला तर सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघ महायुतीकडे असल्याने इथे महायुतीचेच वर्चस्व. महापालिकेच्या मागील कार्यकाळात इथे लोकसभा मतदारसंघात भाजपचे २३, तर शिवसेनेचे १२ असे एकूण ३५ नगरसेवक असे बलाबल होते. यंदाच्या निवडणुकीत ४० पैकी ३२ जागांवर भाजप तर ८ जागांवर शिंदेसेना लढत आहे. महायुतीच्या विरोधात या लोकसभा मतदारसंघात उबाठा शिवसेना एकूण ३०, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना दहा जागा लढवत त्यांना आव्हान देत आहे.
दहिसर विधानसभा
मनीषा चौधरी सलग तीनवेळा येथून आमदार म्हणून निवडून आल्याने या मतदारसंघावर भाजपची चांगली पकड आहे. महापालिकेच्या मागील कार्यकाळात इथे सहापैकी भाजपचे तीन तर शिवसेनेचे तीन नगरसेवक होते. याशिवाय प्रभाग क्रमांक तीन हा अंशत: या मतदारसंघात मोडतो. तिथेही भाजपचा नगरसेवक होता. या निवडणुकीत भाजपचे चार तर शिंदे सेनेचे दोन उमेदवार रिंगणात आहेत. उबाठाचे विनोद घोसाळकर यांचा हा परिसर. त्यांच्या स्नुषा तेजस्विनी अभिषेक घोसाळकर या अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश करून प्रभाग क्रमांक दोनमधून भाजपच्या तिकिटावर उबाठा शिवसेनेच्या धनश्री कोलगे यांच्याविरोधात लढत आहेत. ही दोन मैत्रिणींमधील लढत असेल. तेजस्विनी मागील महापालिकेत प्रभाग क्रमांक एकमधून निवडून आल्या होत्या. विनोद घोसाळकर हे उबाठा सेनेत असून प्रभाग क्रमांक सातमधून त्यांचे चिरंजीव सौरभ घोसळकर हे भाजपचे गणेश खणकर या दिग्गज उमेदवाराविरोधात लढत आहेत. ही लढत भाजप आणि उबाठा सेना यांच्यासाठी प्रतिष्ठेची असल्याने या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्त्वाच्या लढती
प्रभाग क्रमांक ६
संजना वेंगुर्लेकर (शिवसेना उबाठा), दीक्षा कारकर (शिवसेना)
प्रभाग क्रमांक १०
विजय पाटील (मनसे), जितेंद्र पटेल (भाजप), डॉ. अविनाश संख्ये (कॉँग्रेस)
बोरिवली विधानसभा
भाजप नेते गोपाळ शेट्टी यांची पकड असलेल्या या मतदारसंघात त्यांच्यानंतर विनोद तावडे, सुनील राणे आणि आता संजय उपाध्याय हे वेगवेगळे आमदार निवडून आले असले तरी भाजपचे वर्चस्व कायम आहे. मागील कार्यकाळात इथे भाजपचे पाच, तर शिवसेनेचे दोन उमेदवार होते. यावेळच्या जागावाटपात भाजपच्या पदरात सहा, तर शिवसेनेला दोन जागा मिळाल्या आहेत. विधानसभा निवडणुकीतील मनसेचे उमेदवार कुणाल माईणकर यांच्या सुविद्य पत्नी पूजा माईणकर या प्रभाग क्रमांक १४ मध्ये भाजपच्या ॲॅड. सीमा शिंदे यांच्याशी अटीतटीची लढत देत आहेत. याच प्रभागातील भाजपच्या माजी नगरसेविका आसावरी पाटील या उबाठामध्ये प्रवेश करून प्रभाग क्रमांक १३ मधून भाजपच्या राणी द्विवेदी यांच्याविरोधात लढत आहेत.
महत्त्वाच्या लढती
प्रभाग क्रमांक ९
संजय भोसले (शिवसेना उबाठा), शिवानंद शेट्टी (भाजप), सदानंद चव्हाण (कॉँग्रेस)
प्रभाग क्रमांक १८
सदिच्छा विश्वास मोरे (मनसे), संध्या दोशी (शिवसेना)
मागाठाणे विधानसभा
आमदार प्रकाश सुर्वे यांच्या या मतदारसंघात मागे शिवसेनेचे पाच तर भाजपचा एक नगरसेवक होते. यावेळी सातपैकी शिंदे शिवसेना चार तर भाजप तीन जागा लढवत आहेत. शिवसेनेचे माजी नगरसेवक भास्कर खुरसुंगे आणि रिद्धी खुरसुंगे यांची कन्या डॉ. अदिती खुरसुंगे यावेळी प्रभाग क्रमांक ११ मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत.
महत्त्वाच्या लढती
प्रभाग क्रमांक ३
रोशनी गायकवाड (शिवसेना उबाठा), प्रकाश दरेकर (भाजप), प्रदीप चौबे (कॉँग्रेस)
प्रभाग क्रमांक ११
कविता माने (मनसे), डॉ. अदिती खुरसुंगे
चारकोप विधानसभा मतदारसंघ
आमदार योगेश सागर यांच्या या मतदारसंघात त्यांच्या प्रचंड जनसंपर्काचा लाभ भाजप उमेदवार घेऊ शकतात का हे पाहिले जात आहे. मागील कार्यकाळात इथे भाजपचे पाच, तर शिवसेनेचा एक नगरसेवक होता. यावेळी सर्वच्या सर्व म्हणजे सहाही जागा भाजपच्या पदरात पाडल्या आहेत. येथील भाजपच्या वर्चस्वासमोर विरोधकांना तगडे आव्हान द्यावे लागेल.
महत्त्वाच्या लढती
प्रभाग क्रमांक २२
हिमांशू पारेख (भाजप), आशीष पाटील (शिवसेना उबाठा), प्रदीप कोठारी (कॉँग्रेस)
प्रभाग क्रमांक ३०
धवल वोरा (भाजप), डॉ. दिवाकर पाटील (शिवसेना उबाठा)
कांदिवली (पूर्व) विधानसभा
आमदार अतुल भातखळकर यांच्या या विधानसभा मतदारसंघातील सातपैकी सहा नगरसेवक भाजपचे, तर एक शिवसेनेचा होता. यावेळीही तीच स्थिती कायम आहे. अतुल भातखळकर हे अभ्यासू नेते असून मागील निवडणुकीत त्यांनी कॉँग्रेसच्या कालू बुधेलिया यांचा ८३ हजार मतांची आघाडी घेत पराभव केला होता. ही मते आपल्याकडे कायम राखण्यात भाजपला यश मिळाले, तर महायुतीचे पारडे येथे जड राहू शकेल.
महत्त्वाच्या लढती
प्रभाग क्रमांक २३
किरण जाधव (मनसे), शिवकुमार झा (भाजप), राजेंद्रप्रताप पांडे (कॉँग्रेस)
प्रभाग क्रमांक २९
सचिन पाटील (शिवसेना उबाठा), नितीन चौहान (भाजप), देवकुमार कनोजिया (कॉँग्रेस)
मालाड विधानसभा
महाविकास आघाडी सरकारच्या राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपद भूषवलेले कॉँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांचा हा मतदारसंघ असून मालवणीसारखा मुस्लीमबहुल परिसर यात मोडतो. मागील विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार विनोद शेलार यांनी अस्लम शेख यांच्यासमोर मोठे आव्हान उभे केले होते. त्यांचा निसटता पराभव झाला. त्याचा कितपत परिणाम या निवडणुकीत पाहायला मिळतो हे लक्षवेधक ठरेल. कारण येथील सर्वच्या सर्व म्हणजे सातही जागा भाजपच लढवत आहे. मागील काळात येथे भाजपचे तीन नगरसेवक निवडून आले होते. खासदार पीयूष गोयल यांनीही येथे बऱ्यापैकी लक्ष केंद्रित केले असून भाजप या भागात आपली पकड बसवू पाहात आहे. या सगळ्याचा भाजप उमेदवारांना कितपत लाभ मिळतो हे निकालानंतर समजेल.
महत्त्वाच्या लढती
प्र. क्रमांक ३३
उज्ज्वला वैती (भाजप), कमरजहा सिद्धीकी (कॉँग्रेस), सारिका पारटे (शिवसेना उबाठा)
प्र. क्रमांक ४६
स्नेहीता डेहलीकर (मनसे), योगिता कोळी (भाजप)
विधानसभा निवडणूक, बिहार निवडणूक आणि अलीकडेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप आणि महायुतीला लाभलेल्या यशाचा फायदा महायुतीचे उमेदवार कितपत उचलतात ते लवकरच स्पष्ट होईल.






