Monday, January 12, 2026

तब्बल ६० हजार मुंबईकरांच्या घरी मतदार माहिती चिठ्ठीचे वाटप

तब्बल ६० हजार मुंबईकरांच्या घरी मतदार माहिती चिठ्ठीचे वाटप

तब्बल ८० हजार कर्मचाऱ्यांना निवडणूक कामांचे प्रशिक्षण

१० हजार २३१ मतदान केंद्रांची उभारणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी तब्बल २२७८ मतदानाची ठिकाणे निश्चित करून तिथे १०,२३१ मतदान केंद्र तयार करण्यात आली असून या निवडणूक कामांसाठी ८० हजार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणात सहभागी करून घेत मनुष्यबळही तैनात करण्यात आले आहे. मुंबईतील प्रत्येक पात्र मतदारापर्यंत ठराविक कालावधीत मतदार माहिती चि‌ट्ठी वेळेत व अचूकरीत्या पोहोचावी, याकामी अत्यंत सूक्ष्म व प्रभावी नियोजन करण्यात येत असून मतदारांचे नाव, पत्ता, मतदार यादीतील भाग क्रमांक, मतदान केंद्राचे नाव व खोली क्रमांक यांसह आवश्यकः माहिती असलेली मतदार माहिती चि‌ट्ठी वितरणाची कार्यवाही सुरू आहे. तब्बल ६० लाख मतदार माहिती चिट्ठीचे वाटप करण्यात येत आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांमध्ये ही सर्व प्रक्रिया पूर्ण केली जाईल असे महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ भूषण गगराणी यांनी स्पष्ट केले.

मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणूक २५ च्या पूर्व तयारीच्या अनुषंगाने महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ भूषण गगराणी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली. या पत्रकार परिषदेला अतिरिक्त आयुक्त डॉ अश्विनी जोशी यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते. मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १७०० उमेदवार निवडणूक रिंगणात असून २२७८ ठिकाणी १० हजार २३१ मतदान केंद्रांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी ६४ हजार ३७५ अधिकारी व कर्मचाऱ्यांची आवश्यकता असली तरी तब्बल ८० हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण प्रक्रियेत सहभागी करून घेण्यात आले आहे. यातील तीन प्रशिक्षणांमध्ये सहभागी न झालेल्या कर्मचारी आणि अधिकारी यांना नोटीस बजावून आवश्यक ती कार्यवाही केली जात आहे. या मतदानासाठी २० हजार कंट्राेल युनिट आणि २५ हजार बॅलेट युनिटचा वापर केला जाणार आहे. तसेच या निवडणूक कामांसाठी २२ हजार पोलिसांची फौज तैनात करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत चांगले काम केल्यामुळे ४५०० हजार स्वयंसेवकांची मदत घेतली जाणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले.

यंदा महापालिकेत प्रथमच 'पाडो' प्रणालीचा भाग

मतदान प्रक्रियेमध्ये मतदान यंत्र कंट्रोल युनिटला जोडण्यात येत असले तरी मतमोजणीच्या दिवशी कंट्राेल युनिटमध्ये बंद पडल्यास यंदा महापालिकेच्यावतीने 'पाडो 'चा वापर केला जाणार आहे. यासाठी राज्य निवडणूक आयाेगाच्या निर्देशानुसार १४० पाडो अर्थात छपाई असलेल्या मतदानाची नोंद असलेल्या कंट्रोल युनिटची पर्यायी व्यवस्था केली जाईल. जर कंट्रोल युनिटमध्ये तांत्रिक बिघड होवून त्यांचा डिस्पले बंद पडल्यास या पर्यायी व्यवस्था असलेल्या पाडोचा वापर करण्याचे अधिकार हे निवडणूक निर्णय अधिकारी असतील. मुंबई महापालिकेत याचा प्रथमच वापर केला जाणार आहे.

मतदान केंद्रांवरील किमान आवश्यक सुविधा

पिण्याचे पाणी,मतदारांसाठी प्रतीक्षागृह / शेड, स्वच्छतागृह, पुरेशी प्रकाशव्यवस्था, दिव्यांग (PWD) मतदारांसाठी योग्य उताराचा रॅम्प व व्हीलचेअर, मानक मतदान कक्ष , आवश्यक दिशादर्शक फलक इत्यादी

गुलाबी मतदान केंद्र

प्रत्येक प्रभागात केवल महिलांकन केलेले किमान एक गुलाबी मतदान स्थापित करण्यात येईल. अशा महिला व्यवस्थापित मतदान केंद्रांमध्ये पोलीस व सुरक्षा कर्मचाऱ्यासह सर्व निवडणूक कर्मचारी महिला असतील. प्रत्येक प्रभागात गुलाबी रंगसंगतीमधील साहित्यप्रकारांचा वापर करून किमान एक आदर्श मतदान केंद्र असेल

पात्र अंतिम उमेदवार - एकूण १,७००( पुरुष ८२२, महिला ८७८)

मतदान केंद्र माहिती

मतदानाची ठिकाणे - २,२७८

मतदान केंद्रे - १०,२३१

मतदान केंद्रांची विगतवारी

शासकीय इमारतीः बंदिस्त जागा २,३८२ । अर्धबंदिस्त जागा- ८७९ । खुल्या जागा- १,१४३

सहकारी गृहनिर्माण संस्थाः बंदिस्त जागा- १८१ । अर्धबंदिस्त जागा- ३१२ । खुल्या जागा- २०९

खासगी इमारतीः बंदिस्त जागा २.६९३ । अर्धबंदिस्त जागा- १.३८५ । खुल्या जागा- १,०४७

एकूण १०२३१ मतदान केंद्रांसाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती

मतदान केंद्राध्यक्ष - (१२,८७५)

सहायक मतदान केंद्राध्यक्ष -(१२,८७५)

मतदान अधिकारी क्र. १-(१२,८७५)

मतदान अधिकारी क्र. २- (१२,८७५)

शिपाई - (१२,८७५)

एकूण - (६४,३७५)

Comments
Add Comment