वार्तापत्र कोकण संतोष वायंगणकर
कोकणातील हापूस आंबा, नारळ, फणस, कोकम, काजू, सुपारी, बांबू, जांभुळ, करवंद या सर्वांमध्ये एक वैशिष्ट्य आहे. कोकणातील शेतकऱ्यांनी आणि कोकणातील ग्रामस्थानीही आपली जमिनीशी असलेली नाळ तोडता कामा नये. कोकणातील निसर्गाने जे भरभरून दिलं आहे ते जपण्याची जबाबदारी या पिढीची आहे. कोकणची अवस्था आज ‘तुझे आहे तुजपाशी परी जागा चुकलाशी’ अशीच झाली आहे.
कोकणाला निसर्गाने भरभरून दिले. फळांच्या बाबतीतही एक वैशिष्ट्य असते. तो स्वाद, पिकणाऱ्या फळांमधलं माधुर्य, रंग यात विविधता आहे. कोकणातील पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या चारही जिल्ह्यांमध्ये पिकणारा भात, आंबा, काजू, कोकम, नारळ, सुपारी अशा सर्व फळपिकांना एक वेगळच वैशिष्ट्य आहे. त्यामुळेच कोकणातला हापूस आंबा काल-आज आणि उद्याही जगभराच्या बाजारातील आंब्याच्या स्पर्धेत टिकून राहील यात शंका नाही. कोकणात पिकणाऱ्या फळांना मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, कोल्हापूर या महाराष्ट्रातील प्रमुख शहरांव्यतिरिक्त देशभरातील अनेक बाजारपेठेत कोकणातील हापूस आंबा, काजू, जांभुळ, फणस या सर्वच फळांना खूप मागणी आहे. कोकणातील फळांच्याबाबतीत त्या फळांवर प्रक्रिया करणारे उद्योग उभे राहिले नाही. तसे प्रक्रिया उद्योगांच्या बाबतीतले प्रयत्नही फारच तोकडे आहे. कोकणात सहकार रूजला नाही. जो प्रयत्न पश्चिम महाराष्ट्रात झाला तो कोकणात गावातील सहकारी सोसायटी, जिल्ह्याची बँक आणि तालुक्यातील खरेदी-विक्री संघ या मर्यादेत आणि चौकटीतच सहकार राहीला.
कोकणातील उत्पादित होणाऱ्या सर्वच फळांवर प्रक्रिया होणं गरजेचं होतं; परंतु ज्या प्रमाणात प्रक्रिया उद्योग सध्या आहे त्याचं स्वरूप आणखी मोठं होण्याची निश्चितच आवश्यकता आहे. त्यासाठी कोकणातील राजकिय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रात काम करणाऱ्यांनी याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. एकीकडे कृषी क्षेत्रात नव-नवे प्रयोग कोकणात होत असताना कृषी क्षेत्राशी सर्वच बाबतीत विचार होण्याचीही आवश्यकता निश्चितपणे आहे. एकीकडे कोकणात अमुक उद्योग नको, दुसऱ्या कुठल्या उद्योगांना जर विरोध होत असेल तर मग निश्चितपणे ज्या उद्योगांनी कोकणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील अशा उद्योगांची पाठराखण करून तसे उद्योग जे उभारू इच्छित आहेत त्यांना निश्चितपणे पाठबळ देखील देण्याची आवश्यकता आहे. कोकणातील हापूस आंबा, तर स्वत:ची बाजारपेठ निर्माण करून आहे. कर्नाटक, गुजरात राज्यांतील आंब्याच्या अतिक्रमणाच संकट कोकणातील हापूसवर आहेस काही राज्यातील आंबा कोकणचा हापूस हा ब्रॅण्ड वापरून बाजारात विक्री होताना दिसतो पण याला जबाबदारही कोकणातील आंबा बागायतदार शेतकरीच आहे.
कोकणातील आंबा बागायतदार शेतकरी परराज्यातून येणारा आंबा कोकणच्या हापूस नावाने विक्री होत असतानाही त्याकडे फार गांभिर्याने पहात नाही. त्यामुळेच पुणे, मुंबईच्या नव्हेतर कोकणच्या हमरस्त्यांवर परराज्यातील आंबे विक्रीला येतात. जस आंब्याच्याबाबतीत आहे तीच स्थिती कोकणातील काजूच्याबाबतीतही आहे. कोकणात ब्राझील, आफ्रीकेचा काजू येतो. खरंतर कोकणातील काजूगराची टेस्ट अन्य काजूगरांना नाही. त्यामुळे कोकणातील काजूगरालाही मागणी आहे; परंतु कोकणातील पिकणाऱ्या फळांवर सर्वांकडूनच अतिक्रमण होत आहे. कोकणातील ओल्या काजूगरालाही मोठी मागणी आहे. गेल्याकाही वर्षांमध्ये ओल्या काजूगराला कोकणात मागणी आहे. ओल्या काजुगराची मागणी तर गेल्या तीन-चार वर्षांत वाढली. यामुळे काजू बागायतदार देखील ओले काजूगर काढून विक्री करताना दिसतात. काजू बी तयार होईपर्यंत वाट पहाण्याची आवश्यकता नसते. काजू बी तयार होणार त्याच्या वजनातील होणारी घट याचा विचार करता ओले काजूगर काढून विक्री होऊ लागली. अगदी तीन-चार वर्षांतच ओले काजूगर विक्रीचे एक नवे मार्केट तयार झालं. पुणे, मुंबई, कोल्हापूरसारख्या शहरांमध्ये ओल्या काजूगराला मोठी मागणी आहे. ओल्या काजूगराची वाढत जाणारी मागणी लक्षात घेऊन कोकण कृषी विद्यापिठांतर्गत असलेल्या वेंगुर्ले फळ संशोधन केंद्रात वेंगुर्ले-१० एमबी ही नवी काजू जातीच वाण निर्माण करण्यात आले. काजू ‘बी’च्या बाबतीत विद्यापिठाने वेंगुर्ले-७ हे वाण देखील कोकणात लागवड करण्यात आली. कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काजू लागवड मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेली आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातही काजू बागायतदारांनी काजू लागवड केली. त्यामुळे आंब्या बरोबरच काजू बागायतदारांची संख्याही काही कमी नाही. कोकण कृषी विद्यापिठाच्या काजूच्या बाबतीतील नवनवीन संशोधनातून कोकणात काजू बागायत क्षेत्र वाढत चालले आहे. ओल्या काजूगरांची बाजारपेठ कोकणवासीयांच्या हाती राहावी यासाठी कोकण कृषी विद्यापिठाच्या ‘वेंगुर्ला-१० एमबी’ या नव्या काजू वाणाचा चांगलाच उपयोग आणि फायदाही होणारा.
कोकणातील जांभुळच्याबाबतीतही तीच स्थिती आहे. त्याबाबतीतही कोकणातील शेतकरी फार जागा नाही. कोकणातील बांबूच्या बाबतीतही वेगळी स्थिती नाही. पूर्व पिढ्यांनी लागवड शेतातील हद्दीवर लागवड केलेल्या बांबूच्या बेटांचे आजही कोकणातील शेतकरी उत्पादन घेत आहे; परंतु त्यातही काहींनी बांबू लागवड करून व्यावसायिकता जोपासली. खाडी पट्ट्यातील बांबूलाही फार मोठी मागणी आहे. वन्यप्राण्यानी बांबूचेही नुकसान केलेय हे खर असले तरीही काही शेतकऱ्यांनी त्यातही बांबू उत्पादन घेतले. कोकणात सगळेच पिकतय. बऱ्याचअंशी हे सारे पीक निसर्गावर अवलंबून आहे हे खर असले तरीही त्यातही कोकणाला फळांच्याबाबतीत निसर्गानेही बरेच वेगळेपण तर दिले आहेच आणि ते देताना इतरांपेक्षा एक वेगळी टेस्ट दिली. यामुळेच कोकणातील हापूस आंबा, कोकणातील नारळ, फणस, कोकम, काजू, सुपारी, बांबू, जांभुळ, करवंद या सर्वांमध्ये एक वैशिष्ट्यता आहे. जी गुणधर्मता इतर कशामध्येही उपलब्ध नाही एकीकडे हे सगळ असले तरीही कोकणातील शेतकऱ्यांनी आणि कोकणातील ग्रामस्थानीही आपली जमिनीशी असलेली नाळ तोडता कामा नये.
कोकणातील निसर्गाने जे भरभरून दिलं आहे ते जपण्याची जबाबदारी आजच्या पिढीचीच आहे. कोकणची अवस्था आज ‘तुझे आहे तुजपाशी परी जागा चुकलाशी’अशीच झाली. सर्वकाही आहे; परंतु आपल्याकडे काहीच नाही. या मानसिकतेतून कोकणाने बाहेर येण्याची आवश्यकता आहे.