Tuesday, January 13, 2026

तेजस नेटवर्क शेअर्समध्ये धुळधाण! तिमाही निकालानंतर थेट १२% कोसळला

तेजस नेटवर्क शेअर्समध्ये धुळधाण! तिमाही निकालानंतर थेट १२% कोसळला

मोहित सोमण: तेजस नेटवर्क कंपनीच्या शेअर्समध्ये इंट्राडे मोठी घसरण झाली आहे. थेट १२% शेअर कोलमडल्याने दुपारी १२.२५ वाजेपर्यंत कंपनीच्या शेअर ३६४.२० रूपयांवर पोहोचला आहे. कंपनीने १९६ कोटी निव्वळ तोटा नोंदवल्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये ही मोठी घसरण झाली आहे.

तेजस नेटवर्क (Tejas Networks Limited) कंपनीचा तिमाही निकाल जाहीर झाला आहे. यापूर्वी एक्सचेंज फायलिंगमध्ये कंपनीने दिलेल्या माहितीनुसार,कंपनीच्या निव्वळ महसूलात इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) २६४२ कोटीवरून ३०७ कोटींवर घसरण झाली होती. तर कंपनीच्या करपूर्व नफ्यात (Profit before tax PBT) गेल्या वर्षाच्या तिमाहीतील २११ कोटीवरून यावर्षीच्या तिमाहीत (Q3FY26) ३०३ कोटीवर वाढ झाली. या तिमाहीत कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, निव्वळ नफ्यात घसरण झाली असली तरी कंपनीच्या करोत्तर नफ्यात (Profit after tax PAT) इयर ऑन इयर बेसिसवर तिसऱ्या तिमाहीत १६६ वरून १९७ कोटींवर वाढ झाली आहे.

बंगळूर स्थित तेजस नेटवर्क्स लिमिटेड कंपनी जागतिक वायरलाइन आणि वायरलेस नेटवर्किंग उत्पादने कंपनी असून कंपनी टाटा समुहाची उपकंपनी (Subsidiary) आहे. तेजस उच्च कार्यक्षमता असलेली उत्पादने डिझाइन आणि उत्पादित करते. ज्यामध्ये 4G/5G रेडिओ ॲक्सेस (LTE/NR),ऑप्टिकल ट्रान्समिशन (DWDM/OTN), फायबर ब्रॉडबँड (GPON/XGS-PON), आणि कॅरियर-ग्रेड स्विचेस व वायफाय राउटर्स या उत्पादनाचा समावेश आहे. यापूर्वी गुंतवणूकदारांनी तिमाही निकालांच्या पूर्व परिस्थितीत नकारात्मक कौल दिल्याने शेअर ५.२२% कोसळत ४१८.६५ रूपये प्रति शेअरवर बंद झाला होता. गेल्या पाच दिवसांत कंपनीच्या शेअर्समध्ये ८.२२%,१ महिन्यात ९.३०%, तर वर्षभरात ६०.५७% घसरण झाली असून मात्र इयर टू डेट बेसिसवर (YTD) शेअर्समध्ये ७.२८% घसरण झाली. आज दुपारी १२.३२ वाजेपर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये १०.९७% घसरण झाली आहे ज्यामुळे शेअर ३७१.४० रूपयांवर व्यवहार करत आहे.

Comments
Add Comment