Monday, January 12, 2026

टाटा मुंबई मॅरेथॉनसाठी धावपटू सज्ज

टाटा मुंबई मॅरेथॉनसाठी धावपटू सज्ज

मुंबई : आशियातील सर्वात मानाची आणि जगातील अव्वल मॅरेथॉनपैकी एक असलेली 'टाटा मुंबई मॅरेथॉन' यंदा २१ व्या वर्षात पदार्पण करत आहे. येत्या १८ जानेवारी रोजी होणाऱ्या या 'गोल्ड लेबल' रेसमध्ये यंदा जागतिक स्तरावरील अत्यंत वेगवान धावपटूंचा ताफा उतरणार आहे. विशेष म्हणजे, सहभागी होणाऱ्या ८ पुरुष आणि ६ महिला धावपटूंच्या वैयक्तिक सर्वोत्तम वेळा सध्याच्या स्पर्धा विक्रमांपेक्षा अधिक जलद असल्याने, यंदा मुंबईच्या रस्त्यांवर नवे विक्रम प्रस्थापित होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

सध्या पुरुष गटात इथिओपियाचा हायले लेमी बेरहानू आणि महिला गटात अँकिआलेम हायमॅनॉट यांच्या नावावर मुंबई मॅरेथॉनचे विक्रम आहेत. हे विक्रम मोडीत काढणाऱ्या धावपटूला ५० हजार डॉलर्सच्या मुख्य बक्षिसाव्यतिरिक्त अतिरिक्त १५,००० डॉलर्सचे बक्षीस दिले जाणार आहे. या भव्य पारितोषिकांमुळे स्पर्धेची चुरस अधिकच वाढली आहे.

एरिट्रियाचा मेरहावी केसेते या शर्यतीचा मुख्य आकर्षण असेल. त्याच्यासोबत युगांडाचा विश्वविजेता व्हिक्टर किपलांगाट आणि दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी स्टीफन मोकाका हे विजेतेपदासाठी कडवी झुंज देतील. इथिओपियाचे बाजेझेव अस्मारे आणि ताडू डेमे हे देखील विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. महिलांमध्ये गेल्या वर्षीची कांस्य पदक विजेती मीडिना डेमे आर्मिनो यंदा जेतेपदासाठी सज्ज आहे. तिला झिनाह सेनबेटा, येशी चेकोले आणि श्युरे डेमिसे यांसारख्या वेगवान धावपटूंकडून मोठे आव्हान मिळण्याची चिन्हे आहेत.

Comments
Add Comment