पंढरपूर : मकरसंक्रांती आणि भोगी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथील श्री विठ्ठल–रुक्मिणी मंदिरात भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन विशेष दर्शन व व्यवस्थापन आराखडा राबवण्यात येत आहे. परंपरेनुसार साजऱ्या होणाऱ्या या उत्सवासाठी राज्यभरातून हजारो भाविक दाखल होत असून, यंदा महिला भाविकांसाठी दर्शन सुलभ करण्यावर मंदिर समितीने विशेष भर दिला आहे.
भोगीच्या दिवशी पहाटेचे वेळापत्रक बदलणार
मंगळवार, १३ जानेवारी रोजी भोगी उत्सवानिमित्त श्री रुक्मिणी मातेची काकड आरती व नित्यपूजा पहाटे ३.०० ते ४.३० या वेळेत होणार आहे. भोगी अर्पण करण्यासाठी माता व भगिनींना पहाटे ४.३० ते ५.३० या कालावधीत मंदिरात प्रवेश देण्यात येणार आहे. त्यानंतर अलंकार व पोषाख परिधान केल्यानंतर सकाळी ६.३० पासून दर्शन खुले करण्यात येणार आहे.
त्याच दिवशी श्री विठ्ठल मंदिरात काकड आरती व नित्यपूजा पहाटे ४.३० ते ५.४५ या वेळेत पार पडेल. भाविकांसाठी *पहाटे ६.०० नंतर पदस्पर्श दर्शन सुरू होणार आहे.
संक्रांतीच्या दिवशी महिलांना दर्शनात प्राधान्य
बुधवार, १४ जानेवारी रोजी मकरसंक्रांतीनिमित्त नेहमीच्या पूजाविधीनंतर श्री रुक्मिणी मातेचे अलंकार परिधान करून दर्शन सुरू करण्यात येणार आहे. या दिवशी जास्तीत जास्त माता व भगिनींना दर्शनाचा लाभ मिळावा, यासाठी पुरुष भाविकांनी शक्यतो मुखदर्शन घेण्याचे आवाहन मंदिर समितीने केले आहे.
१५ जानेवारीपासून नियमित व्यवस्था
गुरुवार, १५ जानेवारी रोजी काकड आरती, नित्यपूजा आणि दर्शन व्यवस्था पूर्ववत वेळापत्रकानुसार सुरू राहणार आहे.
कडक बंदोबस्त आणि व्यवस्थापन
उत्सव काळात होणारी गर्दी लक्षात घेऊन दर्शनरांगा, सुरक्षाव्यवस्था आणि स्वच्छतेवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. कमांडो पथकांची नियुक्ती, व्हीआयपी दर्शनावर तात्पुरते निर्बंध, टोकन दर्शन व्यवस्था बंद ठेवणे आणि पूजेची संख्या मर्यादित करून भाविकांना अधिक वेळ दर्शनासाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हा उत्सव मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर व सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत असून, भाविकांनी मंदिर प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन प्रभारी व्यवस्थापक संदेश भोसले यांनी केले आहे.






