मुंबई : मराठी सिनेविश्वासाठी नववर्षाची सुरुवात जल्लोषाची ठरली आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘क्रांतीज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार मुसंडी मारत अवघ्या ११ दिवसांत १० कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. मराठी शाळा, मातृभाषा आणि शिक्षणपद्धतीवर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळतोय.
१ जानेवारी २०२६ रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने पहिल्या आठवड्यापासूनच चांगली कमाई केली. मात्र दुसऱ्या आठवड्यात सिनेमाचा वेग अधिक वाढताना दिसतोय. सुट्ट्या आणि वीकेंडचा पुरेपूर फायदा या चित्रपटाला झाला आहे.
कमाईचे आकडे
पहिल्या आठवड्यातील कमाई – ५.७५ कोटी रुपये १० वा दिवस (शनिवार) – १.६५ कोटी रुपये ११ वा दिवस (रविवार) – २.१ कोटी रुपये
एकूण नेट कलेक्शन – १०.१ कोटी रुपये जागतिक कमाई – अंदाजे १२ कोटी रुपये
मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरसह अनेक शहरांमध्ये चित्रपटाचे शो हाऊसफुल्ल जात आहेत. विशेष म्हणजे केवळ मराठी माध्यमातील विद्यार्थीच नाही, तर इंग्रजी माध्यमात शिकणारी मुले आणि पालकही मोठ्या संख्येने हा सिनेमा पाहत आहेत.
अभिनयाचं विशेष कौतुक
सचिन खेडेकर, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर आणि प्राजक्ता कोळी यांच्या अभिनयाचं प्रेक्षकांसह समीक्षकांकडूनही भरभरून कौतुक होत आहे. भावनिक आशय, वास्तवदर्शी मांडणी आणि प्रभावी संवाद यामुळे सिनेमा प्रेक्षकांच्या मनाला भिडतोय.
कमी बजेट, मोठा नफा
या चित्रपटाचं बजेट साधारणतः २ ते ३ कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातं. त्या तुलनेत आतापर्यंत झालेली कमाई पाहता, सिनेमाने आपल्या बजेटच्या तब्बल पाचपट अधिक उत्पन्न मिळवलं आहे. चित्रपट विश्लेषकांच्या मते, येत्या काही दिवसांतच ‘क्रांतीज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ १५ कोटींचा आकडा पार करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.






