निवडणुकांमध्ये काही मतांच्या फरकाने निकाल बदलले आहेत. एक मत म्हणजे एक आवाज. लाखो मतदारांचा मिळून तयार होणारा हा आवाजच शहराचे भविष्य ठरवतो. पालिका निवडणूक ही दैनंदिन आयुष्याशी थेट जोडलेली निवडणूक आहे. दैनंदिन निगडित प्रश्न स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातूनच सुटतात. म्हणूनच पालिका निवडणूक ही प्रत्येकाच्या घरातील सुखदुःखाची निवडणूक आहे.
मुंबई कॉम
अल्पेश म्हात्रे
अखेर नऊ वर्षांनंतर का होईना तो दिवस आला. मुंबईकरांना आपला स्वतःचा प्रतिनिधी निवडण्याची वेळ आली. त्याद्वारे मुंबईचा महापौर हे प्रतिष्ठेचे स्थान निवडण्याची वेळ आली. न्यायालयाच्या आदेशाने वा इतर काही कारणांमुळे रखडलेल्या निवडणुका अखेर नऊ वर्षांनी का होईना होत आहेs. घटनेने दिलेल्या या स्वातंत्र्याचा आपण आता पुन्हा एक प्रकारे उत्सवच साजरा केला पाहिजे. मुंबईकरांना आपला स्वतःचा लोकप्रतिनिधी निवडण्याची वेळ आली. न्यायालयाच्या आदेशाने आता निवडणुका पार पडणार आहेत. त्यासाठी प्रत्येकाने गुरुवारी मतदान केले पाहिजे. आपल्यासाठी सुद्धा आणि येणाऱ्या भविष्यासाठी सुद्धा. अखेर सर्व अडथळे पार पाडून येत्या गुरुवारी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होतील. तब्बल नऊ वर्षांनी होणाऱ्या या निवडणुका या केवळ निवडणुका नसून भविष्यासाठी आपण निवडलेला योग्य मार्ग असेल. बरीच मंडळी निवडणुका आल्या, की त्यावर बहिष्कार टाकण्याची तसेच आम्हाला काय त्यातले म्हणत निवडणुकीकडे पाठ फिरवतात. मात्र हे चुकीचे असून आपणच आपल्या प्रगतीच्या मार्गात अडथळे आणत आहोत हेही त्यांच्या लक्षात येत नाही. जर आपण मतदान केले नाही तर आपल्याला टीका करण्याचा कोणताही हक्क उरत नाही. काहीजण म्हणतात इतर नगरसेवकांची स्थानिक पातळीवरची निवडणूक आहे, मग त्यात काय एवढे; आमच्या एका मतदानाने इतका काय फरक पडतो? मात्र असा सर्वांनीच विचार केला तर मात्र चुकीच्या हाती सत्ता जाऊन त्याचे दुष्परिणामही आपल्यालाच भोगावे लागतील. ही स्थानिक पातळीवरचीच निवडणूक आपल्या शहराला आपण निवडून दिलेल्या उमेदवाराकडून चांगली कामे करून घेऊन आपले शहरच नव्हे, तर देश घडवण्यास आपण मदत करत असतो हेही लक्षात घ्यावयास हवे. ही निवडणूक नगरसेवकांसाठी आहे, तर आधी नगरसेवकाचं खरं महत्त्व पटवून घेतले पाहिजे.
आपल्या रोजच्या आयुष्यात ज्या कामांशी आपला संबंध येतो त्या रस्ता, पाणी, वीज, कचरा, नाले, शाळा, दवाखाना, परिवहन सेवा ही सगळी कामं थेट नगरसेवकाच्या हातात असतात. आपल्या गल्लीतला खड्डा, बंद लाईट, भरलेली गटारं, कचऱ्याचा ढीग,बस सेवा हे सगळं नगरसेवकाकडेच जाते. आपल्या वॉर्डमध्ये काही चांगलं झालं, तर त्यामागे नगरसेवकाची धावपळ असते. काही बिघडलं, तर आपण पहिल्यांदा जाऊन जाब विचारतो तोही नगरसेवकालाच. म्हणजे तो आपला सगळ्यात जवळचा लोकप्रतिनिधी असतो. म्हणूनच पालिका निवडणूक फार महत्त्वाची आहे. आपण ज्याला मत देतो, तोच पुढची पाच वर्षं आपल्या भागाचं नशीब ठरवतो. चुकीचा माणूस निवडला, तर पाच वर्षं तक्रार करत बसावं लागतं. योग्य माणूस निवडला, तर आपला परिसर बदलून जातो. जो फोन उचलतो, लोकांना भेटतो, कामासाठी मागे लागतो, अधिकाऱ्यांकडे धावपळ करतो आणि प्रश्न सुटेपर्यंत शांत बसत नाही, असा नगरसेवक हवा. फक्त बॅनर लावणारा, भाषण देणारा, पण काम न करणारा नको. हेही लक्षात असू द्या. एकदा प्रचारासाठी आपल्या दारात आला आणि पाच वर्षे तो गायब झाला असाही नको, म्हणून योग्य त्या व्यक्तीची निवड ही खूप जरुरी म्हणूनच मतदानाच्या दिवशी आळस झटकून बाहेर पडा आणि योग्य त्या व्यक्तीला मत द्या. आपल्या विभागातील रस्ते पाणी, लाईट, कचरा, दवाखाना याची कमतरता व त्यांची परिस्थिती हे सगळं मत देताना आठवा. 'माझ्या घराजवळचं काम कोण करून देईल?' हा प्रश्न स्वतःला विचारा आणि मगच बटन दाबा. आपलं एक मत म्हणजे आपल्या वॉर्डचं भविष्य आहे. चुकीचं मत दिलं, किंवा मत दिलंच नाही, तर नंतर बोलायचा अधिकारही आपोआप कमी होतो. म्हणूनच पहिले मतदान, मग बाकी सगळी कामं!
आपल्या वॉर्डसाठी, मुलांच्या भविष्यासाठी आणि रोजच्या सोयीसाठी नक्कीच मतदान करा. याचा खरा अर्थ फक्त भाषणांत, घोषणा देण्यात किंवा सोशल मीडियावर मत मांडण्यात नाही, तर प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मत नोंदवण्यात आहे. पालिका निवडणूक ही दैनंदिन आयुष्याशी थेट जोडलेली निवडणूक आहे. दैनंदिन निगडित प्रश्न स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातूनच सुटतात. म्हणूनच पालिका निवडणूक ही केवळ राजकारणाची नाही, तर घराघरातील सुखदुःखाची निवडणूक आहे. आज अनेकजण म्हणतात, 'माझ्या एका मताने काय फरक पडणार?' पण इतिहास सांगतो, की अनेक निवडणुकांमध्ये काही मतांच्या फरकाने निकाल बदलले आहेत. एक मत म्हणजे एक आवाज. लाखो मतदारांचा मिळून तयार होणारा हा आवाजच शहराचे भविष्य ठरवतो. मुंबई महानगरपालिकेची ही निवडणूक म्हणजे आपल्या देशाचे एक नाकच आहे, म्हणून येथे सत्ता असावी असे प्रत्येक पक्षाला वाटते. आपले शहर हा देशाचा मानबिंदू असतो. परदेशात येणारा प्रवासी हा मुंबई दिल्लीसारख्या शहरांवरूनच आपल्या देशाचे चित्र रंगवतात. ७४ हजार कोटी अर्थसंकल्प व ८० हजार कोटींच्या ठेवी असलेली व एका राज्याचा अर्थसंकल्प असणारी मुंबई महानगरपालिका यावर योग्य सत्ता असणे खूप महत्त्वाचे आहे. म्हणून आपण दिलेले लोकप्रतिनिधीही तेवढेच अभ्यासू व तोडीचे असणे आवश्यक आहे. म्हणून मुंबईकरांचे मतदान आवश्यक आहे. यंदाच्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढीसाठी मुंबई महापालिका प्रशासन व राज्य निवडणूक आयोगाने जोरदार प्रयत्न सुरु केलेत. परंतु सन २०१२ च्या निवडणुकीत ४४.७५ टक्के मतदान झाले होते, तर २०१७ च्या निवडणुकीत ५५.५३ टक्के मतदान झाले होते. त्यामुळे सध्या होऊ घातलेल्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढण्याचे पालिका व राज्य निवडणूक आयोगासमोर आव्हान असले तरी सच्चा मुंबईकरांसाठी ती भूषणावह बाब नक्कीच नाही. तरी यंदा ही परिस्थिती बदलेल अशी आशा करूया!